Anandacha Shidha : ‘आनंदाचा शिधा’ लांबणीवर! आचारसंहितेमुळे लाभार्थी वंचित

 स्वस्त धान्याचा लाभ मिळणाऱ्या लाभार्थ्यांना राज्य शासनाच्यावतीने १०० रुपयांत आनंदाचा शिधा (Anandacha shidha) दिला जातो. यावर्षी दिवाळीला मिळणारा आनंदाचा शिधा मात्र आचारसंहितेमुळे वितरित झाला नाही. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांना शासकीय योजनेच्या लाभापासून वंचित राहावे लागत आहे.

उत्सव काळात स्वस्त धान्य लाभार्थ्यांना शासनाच्यावतीने १०० रुपयांत चार प्रकारचे शिधा दिले जातात. दिवाळी सणानिमित्त मागील वर्षी शिधा वाटप करण्यात आलेले होते; परंतु यावर्षी विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता असल्याने आनंदाचा शिधा वितरणात अडचणी आहेत. विशेष म्हणजे, १ नोव्हेंबरपासून रास्त भाव दुकानदारांनी पुकारलेला बंद मागेघेण्यात आला असला, तरी लाभार्थ्यांना दिवाळीनंतरच धान्य मिळणार आहे. शेकडो रास्तभाव दुकानाच्या माध्यमातून अंत्योदय, प्राधान्य गट योजनेचे हजारी लाभार्थी आहेत. या सर्वांना सरकारने सण-उत्सव काळात आनंदाचा शिधा ही योजना रास्त दुकानाच्या माध्यमातून देणे सुरू केले. प्रत्येक सणाला आनंदाचा शिधा मिळू लागला. या दिवाळीतही आनंदाचा शिधा मिळण्याची शक्यता होती; परंतु मध्येच आचारसंहिता सुरु झाल्याने ऐन दिवाळीत आनंदाचा शिधा वितरणात आडकाठी येत असल्याचे दिसून येते.