मागच्या चार दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने अचानक कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल अर्धा तास धुवाधार पाऊस झाला. पावसाने दिवाळी खरेदीच्या उत्साहावर पाणी फिरवले.पाऊण तासानंतर पाऊस संपल्यानंतर पुन्हा बाजारपेठेत खरेदी विक्रीसाठी सज्ज झाली. तसेच जिल्ह्यातील अनेक तालुक्यात तुरळक सरी पडल्याने शेतकरी भात कापणीसाठी गडबड करू लागले आहेत. दरम्यान कोल्हापूर वेधशाळेकडून मिळालेल्या माहितीनुसार आज (ता. ३१) पावसाची शक्यता असल्याची माहिती दिली आहे.
जिल्ह्यातील राधानगरी, करवीर, हातकणंगले तालुक्यात पावसाने हजेरी लावली. सध्या ग्रामीण भागात भात, सोयाबीन आणि भुईमूग पिकांची काढणी सुरू आहे. मागच्या काही दिवसात झालेल्या पावसाने शेती पिकाचे मोठे नुकसान झाले अशातच काल रात्री अचानक आलेल्या पावसाने शेतकऱ्यांची आणखी चिंता वाढली आहे.दिवाळीनिमीत्त खरेदी-विक्री जोरात होती. रात्री सव्वा दहा वाजण्याच्या सुमारास अचानक पाऊस आला. विक्रीसाठी मांडलेल्या स्टॉल्सवरील साहित्य भिजू लागले. तेव्हा विक्रेत्यांनी प्लास्टिक कागद झाकून साहित्याचे संरक्षण केले. मात्र पावसाची जोरदार सरी सुरू होत्या.
रांगोळी, हळदी कुंकू, बुक्का पावसात भिजू लागले, अशीच अवस्था कापड विक्रेत्यांची झाली. तातडीने स्टॉल्स बंद करण्यात आले. तर खरेदीस आलेल्या महिला बालकांनी अवतीभोवतीच्या दुकानांचा आसरा घेतला. अवघ्या दहा मिनिटांत रस्त्यावरून पाण्याचे पाट वाहू लागले.