पवार कुटुंबीय दिवाळीला एकत्र दिसतील का? अजित दादा म्हणाले….

दिवाळी म्हटलं की, बारामतीत पवार कुटुंबीय एकत्रित येण्याचा क्षण असतो. मात्र आधी लोकसभा आणि आता विधानसभेत पवार कुटुंबियांत राजकीय कटुता निर्माण झालीय. त्यामुळे आता या दिवाळीत पवार कुटुंबीय एकत्रित येतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे. अशातच अजित पवारांना याबाबत विचारलं असता आपल्याला दिसेलचं, असं म्हणत त्यांनी स्पष्टपणे बोलणं टाळलं. तर सुप्रिया सुळे असं म्हणताच भाऊबीजबद्दल पत्रकार विचारतील हे हेरून अजित पवारांनी काढता पाय घेतला. पुरंदरमध्ये अजित पवारांनी उमेदवार दिल्याने शिवसेनेच्या विजय शिवतारेंनी टीका केली. याबाबत अजित पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता, मला महायुतीत एकोपा ठेवायचा आहे. त्यांच्यावर इतर नेते उत्तर देतील, असं अजित पवार म्हणाले.

चिंचवडमधील तिढा सोडविण्याच्या दृष्टीने अजित पवारांनी नाना काटे यांची भेट घेतली. मात्र काटे माघार घेणार का? यावर ही 4 तारखेला चित्र स्पष्ट होईल, असं अजित पवार म्हणाले. दुसरीकडे मावळ विधानसभेत सुनील शेळकेंचा प्रचार करायला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे इतर नेते येतील, असा दावाही अजित पवारांनी केला. मावळ पॅटर्न अडचणीचा ठरेल का? असं विचारलं असता, थोड्या दिवसांत तोडगा निघेल, असा विश्वास ही त्यांनी व्यक्त केला.

“चिंचवडची जागा महायुतीत भाजपला गेली आहे. नाना काटे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय, म्हणून भेटायला आलो आहे. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र आहेत. मी सांगेल तोच निर्णय घ्यावा लागेल, असं मी त्यांना सांगितलं आहे. मावळमध्येही तिढा निर्माण झालाय. याबद्दल काल चर्चा झाली आहे. अशा ठिकाणी सामंजस्य भूमिका घ्यावी लागेल. उमेदवाराने ऐकलं नाही तर काही कठोर निर्णय घेणार. यातून मार्ग काढणार”, अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी यावेळी दिली. “मी महायुतीचा जबाबदार व्यक्ती आहे. प्रत्येकाच्या बद्दल बोलणार नाही. 20 तारखेपर्यंत एकोपा ठेवायचा आहे. यावर मी उत्तर देणार नाही. आम्हाला महायुतीचा सरकार आणायचं आहे”, असं अजित पवार म्हणाले. यावेळी अजित पवारांना बारामतीत पवार कुटुंब एकत्र दिसणार का? असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “ते आपल्याला दिसेल”, अशी प्रतिक्रिया दिली.