इस्लामपुरात एकाच नावाचे तीन-तीन उमेदवार; नामसाधर्म्याचा फटका कोणाला बसणार याची चर्चा

इस्लामपूर विधानसभा मतदार संघ निवडणुकीसाठी २३ उमेदवारी अर्ज दाखल झाले. त्यापैकी २२ उमेदवारी अर्ज वैध झाले आहेत. यामध्ये जयंत पाटील- निशिकांत पाटील नावाचे तीन-तीन उमेदवारी अर्ज वैध ठरले आहेत. हे तिन्ही अर्ज राहिले तर बॅलेट पेपरवरील जयंत पाटील- निशिकांत पाटील नावाच्या कोणत्या उमेदवारापैकी नेमके कोणाला मतदान करायचे याबाबत संभ्रम प्रश्न निर्माण होऊ शकतात. नाम साधर्म्यामुळे इस्लामपूरची काँटे की टक्कर निवडणूक कोणाला तारक आणि कोणाला मारक ठरणार हे पाहावे लागणार आहे. ही निवडणूक कोणाला जिंकून देणार याबाबत चर्चा सुरू आहेत. 

राज्यात शिवसेना राष्ट्रवादी या पक्षाच्या फुटीनंतर दोन पक्षाचे चार पक्ष झाले. आणि ते एकमेकांसमोर भिडत आहेत. पक्ष नंतर सर्वत्र कार्यकर्ते फुटीचेही कैजाळ उठले आहे. मागील निवडणुकीत जे पक्ष एकसंघ लढले तेच आता प्रमुख लढतीत एकमेकांसमोर भिडले आहेत. इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादीचेच निशिकांत पाटील लढत हे आहेत. आता जयंतरावांचे मागील निवडणुकीचे घड्याळ चिन्ह निशिकांत पाटील यांना मिळेल, तर जयंतरावांना नव्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर आपल्याच पूर्वीच्या घड्याळावर मात करावी लागणार आहे.

इस्लामपूर मतदारसंघात चिन्हाचा, पक्षाचा घोळ मतदारात, समर्थकांमध्ये संभ्रम निर्माण करीत असताना, उमेदवारीच्या नावातील साधर्म्याने मतदारांची संभ्रमावस्था आणखी वाढली आहे. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार या पक्षाकडून आमदार जयंत पाटील, अजित पवार पक्षाकडून निशिकांत पाटील यांनी उमेदवारी अर्ज भरलेत. शिंदे शिवसेनेचे तालुकाप्रमुख सागर मलगुंडे यांनी अपक्ष अर्ज दाखल केलाय. मागील निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवारी विरोधात भाजपाचे निशिकांत पाटील यांनी बंडखोरी केली होती. त्याचा बदला घेण्याचा डाव येथे आखला जातोय का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.