उंबऱ्याला लक्ष्मीची पावलं, दाराला झेंडुच्या फुलांचे, आंब्याच्या पानांचे तोरण दारात सुरेख रांगोळी, दिव्यांचा मंद प्रकाश, आकाशकंदील, विद्युत रोषणाईच्या तेजाने दिपून गेलेला परिसर, फटाक्यांच्या आतषबाजीने उजळून टाकलेला आसमंत अशा मंगलमयी वातावरणात शुक्रवारी इचलकरंजीकरांनी लक्ष्मी-कुबेर पूजन उत्साहात केले. दिवाळी आता मध्यावर आल्याने सणाच्या आनंदाला उधाण आले आहे. नागरिकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. सहा दिवसांचा उत्सव असलेल्या दिवाळीच्या सणातील सर्वात महत्वाच्या दिवसांपैकी श्री लक्ष्मी व कुबेर पूजनाचा दिवस शुक्रवारी होता. दिवाळी अमावस्येच्या सायंकाळी म्हणजेच प्रदोष काळी धनाची देवता श्री लक्ष्मी व कुबेराचे पूजन केले जाते.
यंदा गुरुवारी व शुक्रवारी असे दोन दिवस अमावस्या असल्याने नेमके कधी लक्ष्मीपूजन करावे याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम होता. त्यामुळे विद्युत रोषणाईच्या तेजाने दिपून गेलेला परिसर, फटाक्यांच्या आतषबाजीने उजळून टाकलेला आसमंत अशा वातावरणात शुक्रवारी इचलकरंजीकरांनी लक्ष्मी- कुबेर पूजन उत्साहात केले. काहीजणांनी गुरुवारी सायंकाळी लक्ष्मीपूजन केले. बहुतांशी सर्व नामांकित पंचांग व दिनदर्शिकांमध्ये खुलाश्यासह शुक्रवारी श्री लक्ष्मीकुबेर पूजन दिले आहे. सायंकाळचे सात- साडेसात वाजून गेले. महिलांनी नऊवारी, सहावारी साड्यांची पारंपारिक वेशभूषा करून साजश्रृंगार केला. तरुणींनी लेहंगा, घागरे, सलवार, पुरुषा – मलांनी कुर्ता पायजमा असा पांरपारिक पेहराव करून छान तयार झाले. घराघरांमध्ये मोठ्या उत्साहात, आणि मंगलमयी वातावरणात श्री लक्ष्मी-कुबेराचे पूजन झाले. नैवेद्यं समर्पयामी झाल्यानंतर सर्वांना बत्तासे लाह्यांचा प्रसाद देण्यात आला. श्री लक्ष्मी-कुबेराचे पूजा होताच दारात फटाक्यांची आतषबाजी सुरू झाली.