इचलकरंजीत १७ हजाराचा गुटखा जप्त 

सांगली रोडवरील बालाजी कॉलनी पाटील मळा परिसरात गावभाग पोलिसांनी छापा टाकत १७ हजाराचा सुगंधी सुपारी, तंबाखू व गुटख्याचा साठा जप्त केला. या प्रकरणी इर्शाद जहाँगिर बागवान (वय ४७ रा. बालाजी कॉलनी ग.नं. २) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस कॉन्स्टेबल अमर शिरढोणे यांनी फिर्याद दिली आहे. याबाबत पोलिसांतून मिळालेली माहिती अशी, गुटखा, पानमसाला व सुगंधी तंबाखू विक्री करण्यास बंदी असतानाही पाटील मळा परिसरातील बालाजी कॉलनी गल्ली नं. २ येथील इर्शाद बागवान याच्याकडे मोठ्या प्रमाणात साठा असल्याची माहिती गावभाग पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला असता एम फोर, पानमसाला, व्हीवन तंबाखू, सुगंधित सुपारी अशा विविध कंपन्यांचा बेकायदेशीर साठा मिळून आला. पोलिसांनी सर्व मिळून १७ हजाराचा साठा जप्त केला आहे.