सांगलीत जयंत पाटील यांची कसोटी! मुख्यमंत्रीपदाचे भवितव्य राहणार अवलंबून

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांची कोंडी करण्यासाठी एकास एक लढत निश्‍चित करण्यात महायुती यशस्वी ठरली आहे.

सर्व विरोधक एकत्र आले असले तरी त्याचे मतात परिवर्तन कसे करतात यावर आमदार पाटील यांच्या स्वप्नातील मुख्यमंत्रीपदाचे भवितव्य अवलंबून राहणार आहे.जिल्ह्यात त्यांच्या पक्षाकडे चार जागा असून या सर्वच जागावर विजय संपादन करण्यासाठी आमदार पाटील यांची कसोटी लागली आहे.

आमदार पाटील यांना मतदार संघातच गुुंतवून ठेवण्यासाठी महायुतीने केलेली व्यूहरचना यशस्वी ठरली आहे. त्यांच्या विरोधात उभारलेले इस्लामपूरचे माजी नगराध्यक्ष निशीकांत भोसले-पाटील भाजपचे जिल्हाध्यक्ष होते. मात्र, महायुतीच्या जागावाटपात इस्लामपूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाला देण्याबरोबरच उमेदवार म्हणून भोसले-पाटील यांना भाजपने दिले.

यामुळे या मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटात लढत होत आहे.आमदार पाटील यांनी सलग सात वेळा या मतदार संघाचे एकहाती प्रतिनिधीत्व केले आहे. आतापर्यंत विरोधकांमध्ये गैरमेळ हेच त्यांच्या विजयाचे महत्वाचे कारण मानले जात असले तरी विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून त्यांनी मतांचे जाळे विणले आहे हेही मान्य करावं लागेल.

मात्र, गेल्या ३५ वर्षाच्या कालखंडात मतदार संघातील विकास कामे का झाली नाहीत असा सवाल विरोधकांनी केला आहे, तर आष्ट्यात येउन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कासेगावमध्ये पोलीस ठाणे भाड्याच्या जागेत असल्याची टीका केली. मतदार संघाचे बारामती करतो म्हणणारे आमदार पाटील यांनी केवळ करामती करत गडावर वर्चस्व राखले असल्याचाही आरोप यावेळी झाला.

उस उत्पादकांना साखर उतार्‍यानुसार दर का दिला जात नाही. पुणे जिल्ह्यातील कारखान्याच्या तुलनेत प्रतिटन २०० ते २२५ रूपये कुठे गेले असा सवालही उपस्थित करत आमदार पाटील यांना घेरण्याचे प्रयत्न केले आहेत. याला आता ते कशी मात करतात याकडे लक्ष असणे स्वाभाविकच म्हणावे लागेल.