जयंत पाटील पाहतात भाजप प्रवेशाची स्वप्ने; निशिकांत पाटील 

ज्यांना राजकीय विरोध केला तेच भाजप प्रवेशाची स्वप्ने पाहत आहेत, तर काय बोलायचे ? तेच नेतृत्व भाजप नेतेमंडळीच्या मागेपुढे लुडबुड करत आहेत, अशा शब्दात सांगली जिल्हा भाजपाचे माजी अध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांनी भावना व्यक्त केल्या. आमदार जयंत पाटील यांचे नाव न घेता त्यांनी टीका केली. प्रकाश शिक्षण व आरोग्य संकुलात भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा संवाद मेळावा पार पडला. भाजपाचे ज्येष्ठ नेते, माजी नगरसेवक अध्यक्षस्थानी होते. यावेळी पाटील बोलत होते.स्वाभीमानी मतदारांच्या निर्णयाबरोबर राहून यापुढे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाबरोबर काम करू, असा निर्णय ही त्यांनी जाहीर केला.

ते म्हणाले, इस्लामपूर विधानसभा निवडणुकीतील निसटता पराभव हा स्वाभिमानी मतदारांच्या जिव्हारी लागला आहे. राजकारणातील सततच्या बदलत्या घडामोडीमुळे ज्या नेतृत्वाने ३५ वर्षे इस्लामपूर अन्यायाचे, घराघरांत फूट पाडण्याचे, कार्यकर्त्यांना अपमानित करण्याचे काम केल, त्या नेतृत्वाचा व माझा अनेकवेळा टोकाचा संघर्ष झाला. तेच नेतृत्व भाजपाच्या नेतेमंडळीच्या मागेपुढे लुडबुड करत असेल, भाजप प्रवेशाची स्वप्ने पहात असेल तर काय बोलायचे ? यावेळी धैर्यशील मोरे, निवास पाटील, दादासाहेब रसाळ, अशोक खोत, मधुकर हुबाले, माणिक आवटी, संजय बेले यांनी आ. जयंत पाटील यांच्यावर टीका केली. वाळवा तालुका भाजपा उपाध्यक्ष प्रा. दत्तात्रय पाटील यांनी प्रास्ताविक केले. रणजित माने यांनी आभार मानले.