महाविकास आघाडीच्या प्रचाराचे नियोजन करण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या शनिवारी झालेल्या संयुक्त बैठकीत प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील व आमदार डॉ. विश्वजित कदम यांची चुकामूक झाली.
ही चुकामूक जाणीवपूर्वक होती, की अनावधनाने होती यावर आता राजकीय क्षेत्रातून चर्चा सुरू आहे.
सांगलीतील मविआच्या जागेवर काँग्रेसचा नैसर्गिक हक्क जाणीवपूर्वक डावलला गेला असल्याची भावना काँग्रेस कार्यकर्त्यांची असून जिल्ह्यातील जबाबदार आणि वरिष्ठ नेते असलेल्या आमदार पाटील यांनी यामध्ये हस्तक्षेप करून ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी काही प्रयत्न केले नसल्याचे आरोप केला जात असून या जागावाटपात माझा काहीच संबंध नसल्याचा खुलासाही आमदार पाटील यांनी वेळोवेळी केला आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या मेळाव्यात डॉ. कदम यांनी या मागे षडयंत्र असल्याचा आरोप करत या राजकीय खेळीला पुढील काळात उत्तर दिले जाईल असे जाहीरपणे सांगितले होते. या पार्श्वभूमीवर आज दोन्ही काँग्रेस आणि उबाठा शिवसेना कार्यकर्त्यांची प्रचाराचे नियोजन करण्यासाठी बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीस केवळ पक्षाचे कार्यकर्तेच उपस्थित राहतील असेही बजावण्यात आले होते. बैठकीस शिवसेनेचे संपर्क प्रमुख नितीन बानुगडे, आ. अरुण लाड, आ. सुमनताई पाटील आदी उपस्थित होते.
माध्यमांनाही या बैठकीस प्रवेश नाकारण्यात आला. मात्र, बैठकीची नियोजित वेळ सकाळी साडेनऊची असताना आमदार पाटील यांनी सव्वा नऊ वाजताच बैठकीच्या ठिकाणी आगमन झाले. सातारा जिल्ह्यात पक्षाध्यक्ष खा.शरद पवार यांची सभेसाठी जावे लागणार असल्याने त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना मविआचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्यासाठी ताकदीने प्रयत्न करण्याचे आवाहनवजा आदेश देउन ते पुढील कार्यक्रमासाठी रवाना झाले.