राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून 23 नोव्हेंबर रोजी निकाल जाहीर होणार आहे. त्यामुळे, राजकीय नेत्यांनी प्रचारसभांचा आणि गाठीभेटींचा धडाकाच सुरू केला आहे.त्याच पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगही जोमाने कामाला लागले असून भरारी पथके, स्थिर पथके, पोलीस यंत्रणा व प्रशासकीय यंत्रणांच्या माध्यमातून मतदानाचा टक्का वाढवा यासाठी जनजागृती करत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील शिवसेना उमेदवारांशी एका पत्राद्वारे संवाद साधला आहे त्यापैकी खानापुर विधानसभा मतदारसंघातील शिवसेना महायुतीचे अधिकृत उमेदवार सुहास बाबर यांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एक पत्र पाठवून प्रचाराचा कानमंत्र दिला आहे. उत्साहाच्या भरातही आपला तोल ढळू नये, कोणाविषयी अपशब्द निघू नये, कुणाचा अपमान होऊ नये याची दक्षता उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनाही घेतली पाहिजे.चांगल्या विचाराने लढू या आणि महाराष्ट्राचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाऊ या. असेही मुख्यमंत्री शिंदे यांनी या पत्रात नमूद केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी दिलेल्या पत्रात म्हटले आहे, महाराष्ट्रातील मतदार विधानसभा निवडणुकीला सामोरे जात आहेत, परंतु त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे राज्यातील २८८ मतदारसंघात हजारौ उमेदवार मतदारांना आणि एकमेकांनाही सामोरे जाणार आहेत. निवडणूक प्रचारात, प्रचारसंभामध्ये, माध्यमांच्या मुलाखतींमध्ये उमेदवार जे बोलणार आहेत, त्यातून त्यांचे चारित्र्य आणि व्यक्तिमत्व लोकांसमोर येणार आहे. निवडणूक आणि प्रचार म्हटले की आरोप-प्रत्यारोप, एकमेकांच्या चुका दाखवण्याचा प्रयत्न, टीका होणारच. ते साहजिकही आहे.
परंतु उत्साहाच्या भरातही आपला तोल ढळू नये, कोणाविषयी अपशब्द निघू नये, कुणाचा अपमान होऊ नये याची दक्षता उमेदवारांनी आणि कार्यकर्त्यांनाही घेतली पाहिजे. आपल्या मराठी भाषेत अनेक म्हणी आहेत, ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ ही म्हण लक्षात ठेवून शहाणपणाने वागणे आणि बोलणे ही निवडणूक काळाची मोठी गरज आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आज जगभरात प्रत्येक क्षेत्रात महिलांनी आपल्या कर्तृत्वाची गुढी रोवली असताना त्यांच्याविषयी बोलताना, त्या कोणत्याही बाबतीत पुरुषांच्या तुलनेत कमी नाहीत याची जाणीव ठेवली पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांनी महिला सन्मानाची शिकवण दिली आहे.
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे महिलांना रणरागिणी म्हणत असत. त्यांच्या विचारांचे आपण पाईक आहोत, याचे भान ठेवणे आवश्यक आहे. महिलांचा अवमान होईल, असे कोणतेही भाष्य करणे संयुक्तिक नाही. आपल्या देशात तरुण, महिला, शेतकरी आणि गरीब अशा फक्त चार जाती आहेत, असे पंतप्रधान मा. नरेंद्र मोदी यांनी सांगितले होते. त्याला अनुसरून या चार घटकांच्या कल्याणाचा ध्यास घेत महायुती सरकारने गेल्या अडीच वर्षात अनेक योजना राबवल्या. या घटकांची केवळ प्रगती नव्हे तर त्यांचा सन्मान करणे, आदर राखणे ही सुद्धा प्रत्येक कार्यकर्त्यांची, प्रत्येक उमेदवाराची जबाबदारी आहे.
गेल्या अडीच वर्षात आपल्या नेतृत्वाखालील महायुती सरकारने या समाज घटकांच्या कल्याणासाठी राबवलेल्या
योजनांचे यश सांगणे, त्याची आकडेवारी सादर करणे, ज्यांना या योजनांचा प्रत्यक्ष लाभ झाला त्यांचे अनुभव इतरांपर्यंत पोहोचवणे ही आपल्या सगळ्यांची महत्त्वाची जबाबदारी आहे. मुख्यमंत्री शिंदे या पत्रात म्हणतात, मी नेहमी सांगत असतो की, आरोपांना कामाने उत्तर द्या. आजवर विरोधकांनी केलेल्या आरोपांना आपण कामातून उत्तर दिले आहे. आपले काम दिसले तर आपल्याला बोलण्याची गरज राहत नाही. राज्याच्या विविध भागांत फिरताना हजारो लाखो बहिणींनी आपल्या सरकारला आशीर्वाद दिले आहेत.
लाडकी बहीण योजनेमुळे त्यांना कसे बळ मिळाले, आत्मविश्वास प्राप्त झाला हे सांगत आहेत. हे वास्तव, लाडक्या बहिणींच्या आयुष्यात आलेले आनंदाचे दिवस जनतेपुढे मांडणे हेच प्रचाराच्या काळातले सर्वांत महत्त्वाचे काम आहे. आपण सगळेच कुटुंबवत्सल आहोत. आपल्या घरातही महिला आहेत, भगिनी आहेत. त्यामुळे महिलांचा मान राखणे, आपल्यासोबत महिला कार्यकर्त्याही असतात याचे भान ठेवणे, सभ्यतेची पातळी ओलांडली जाणार नाही हे पाहणे ही सगळ्यांचीच प्राथमिक जबाबदारी आहे.
प्रतिस्पर्धी उमेदवाराने अपशब्द वापरले, खोटे आरोप केले किंवा अपमान केला तर त्याला त्याच्याच भाषेत उत्तर देण्याची तीव्र इच्छा होणे, ही मानवी प्रवृत्ती आहे. परंतु आक्रमक आणि असभ्य होणे यातला फरक प्रत्येकाने समजून घेणे आवश्यक आहे. प्रतिस्पर्धी उमेदवाराला त्याच्याच भाषेत उत्तर देण्यापेक्षा शांतपणे त्याचा मुद्दा खोडून काढला तर त्याला अधिक त्रास होतो. अपशब्दाची परतफेड अपशब्दाने केली तर आपण त्याच्या डावपेचांना बळी पडलो, असे होईल.
त्याचबरोबर लोकांसमोर चुकीची प्रतिमा उभी राहण्याचा धोका असतोच पराभवाची चाहुल लागलेल्या किंवा पराभवाची खात्री पटलेल्या व्यक्तींचा अनेकदा तोल जातो आणि ते बरळू लागतात. टीका करण्यासाठी योग्य मुद्दे नसले की शिव्या शाप देण्याची अनेकांना सवय असते. त्यामुळे विरोधक जर अशी भाषा वापरत असतील तर त्यांनी आताच पराभव स्वीकारला आहे, असे समजायचे आणि आपण आपल्या पद्धतीने प्रचार करत राहायचे.
निवडणूक हा एक टप्पा आहे, तो पार पाडून, विजय मिळवून आपल्याला महाराष्ट्राला प्रगतीच्या नव्या वाटा दाखवायच्या आहेत. गेल्या अडीच वर्षांतील कामगिरीवर विजयाचा कळस चढवायचा आहे. तेव्हा एकत्रितरित्या, चांगल्या विचाराने लढू या आणि महाराष्ट्राचा वैचारिक वारसा पुढे घेऊन जाऊ या. आपणास आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना माझ्या शुभेच्छा! विजय आपलाच आहे….जय महाराष्ट्र
अशा शब्दांत मुख्यमंत्री शिंदे यांनी सुहास बाबर यांना प्रचाराचा कानमंत्र दिला आहे.