माहेरी आलेल्या विवाहितेने स्वतःचा गळा कापून, पोटात चाकू खुपसून संपवले जीवन

आटपाडी तालुक्यांमध्ये एक हृदय पिळवटून टाकणारी घटना उघडकीस आलेली आहे. विवाहितेने केलेल्या आत्महत्येमुळे दहा महिन्यांचा मुलगा पोरका झालेला आहे. आटपाडी तालुक्यातील गोमेवाडी येथील माहेरी आलेल्या विवाहितेने चाकूने स्वतःचा गळा कापून आणि पोटातही खुपसून घेऊन आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडला.

कोमल ऊर्फ ऐश्वर्या चंद्रकांत साळुंखे (वय. २५, रा. वलवण, ता. आटपाडी) असे तिचे नाव आहे. आटपाडी पोलिस ठाण्यात गोमेवाडीचे पोलिसपाटील शामराव पाटील यांनी या घटनेची फिर्याद दाखल केली आहे.याबाबत अधिक माहिती अशी की, कोमल ऊर्फ ऐश्वर्या साळुंखेचा दोन वर्षांपूर्वी वलवण येथील चंद्रकांत साळुंखे यांच्याशी विवाह झाला होता. हा तिचा तिसरा विवाह होता.

यापूर्वी तिचे दोन विवाह झाले होते. सध्या तिला दहा महिन्यांचा लहान मुलगा आहे. ती अनेक वेळा माहेरीच असायची. माहेरी असताना आई आणि वडील, तर सासरी असताना सासू-सासरे मारहाण करत असल्याची १०२ नंबर वरून पोलिसाकडे तक्रार अनेकदा तिने नोंदवली होती. या तक्रारींच्या आधारे पोलिसांनी भेट देऊन तपासही केला होता.

मात्र त्यातून काहीच निष्पन्न झाले नव्हते. काही दिवसांपूर्वी ती माहेरी गोमेवाडी (ता. आटपाडी) येथे आली होती. वडील महेंद्र क्षीरसागर यांचा सलूनचा व्यवसाय आहे. सोमवारी (ता.१३) रोजी सायंकाळी ही घटना घडली, त्यावेळी वडील दुकानात गेले होते; तर ऐश्वर्याची किरकोळ वाद झाल्यामुळे आईही बाहेर गेली होती.

त्यामुळे घरात कोणीच नव्हते. त्यावेळी ऐश्वर्याने साडेसातच्या दरम्यान चाकूने स्वतःच्या पोटात सुरा खुपसून आणि गाळाही कापून घेऊन आत्महत्या केली. दुकानातून रात्री नऊ वाजता वडील घरी आल्यानंतर त्यांना हा सारा प्रकार दिसला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या ऐश्वर्याचा घटनास्थळीच जीव गेला होता.

रात्री उशिरा शवविच्छेदन करून अंत्यविधी केला. यापूर्वीही तिने दोन वेळा आत्महत्येचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. या घटनेची फिर्याद गावचे पोलिसपाटील शामराव पाटील यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.