संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी आता अवघे 4 दिवस उरले आहेत. 20 नोव्हेंबरला राज्यभरात एकाच टप्प्यात मतदान होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होऊन निकाल लागेल. पेठवडगाव येथे आमदार राजूबाबा आवळे यांच्या प्रचारार्थ शहरातून प्रचारफेरी काढण्यात आली. महायुती चुकीचा प्रचार करून महिलांची फसवणूक करत आहे. छत्रपती ताराराणी, अहिल्याबाई होळकर यांच्या विचाराने चालणाऱ्या महिला कधीच महायुतीच्या प्रचाराला बळी पडणार नाहीत असे मत भूषणसिंहराजे होळकर यांनी व्यक्त केले.
महाविकास आघाडीचे उमेदवार आमदार राजू आवळे यांच्या प्रचारार्थ झालेल्या पदयात्रेवेळी ते बोलत होते. होळकर म्हणाले, महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्यासाठी जनतेने महाविकास आघाडीला साथ दिल्याचे चित्र राज्यात दिसत आहे. हातकणंगले मतदारसंघातील उमेदवार राजू आवळे एकनिष्ठ आणि विचारधारेशी कटिबद्ध नेते आहेत.
राज्यात एवढ्या घडामोडी घडल्या तरी ते आपला पक्ष व आघाडीशी प्रामाणिक राहिले आहेत. आमदार राजू आवळे म्हणाले, कोणताही गट-तट न पाहता मतदारसंघात विकासकामे केली. पहिला निधी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सुशोभीकरणास दिला, याचा मला अभिमान वाटतो. जनतेशी नेहमीच थेट संपर्क आहे. विद्याताई पोळ व वडगाव परिसरात मोठी साथ मिळाल्याने माझा विजय निश्चित आहे.
यावेळी माजी नगराध्यक्षा विद्याताई पोळ, गुरुप्रसाद यादव यांची भाषणे झाली.
येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकातून पदयात्रेला प्रारंभ झाला. आंबा रोड, सिद्धार्थनगर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा, पालिका चौक, विजयसिंह यादव पुतळा, गोसावी गल्ली, बिरदेव चौक, पद्मा रोड असा पदयात्रेचा मार्ग राहिला.