विधानसभा निवडणुका जाहीर झाल्या तरी इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात आज अखेर जयंत पाटील यांच्या विरोधातील उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही. महायुतीचा उमेदवार निश्चित नसल्याने घटक पक्ष भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीमधील प्रत्येक इच्छुकाला आपल्यालाच उमेदवारी मिळेल अशी आशा आहे. दुसरीकडे जयंत पाटील व त्यांचे सुपुत्र प्रतीक पाटील यांनी निवडणूक जाहीर होण्याअगोदरच इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचा धावता प्रचार दौरा उरकला आहे. बुधवारी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या निर्धार मेळाव्याची सांगता सभा इस्लामपूर येथे झाली. सध्या जयंत पाटील यांच्यावर पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी असल्याने ते राज्याच्या राजकारणात किंवा प्रचार दौऱ्यात सक्रिय राहतील.
भाजपचे निशिकांत पाटील हे गेले पाच वर्षे विरोधी उमेदवार म्हणून तयारीत आहेत, तर शिंदे सेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार व हुतात्मा उद्योग समूहाचे गौरव नायकवडी शिवसेना गटातून इच्छुक आहेत.इस्लामपूर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे विद्यमान आमदार आहेत. त्यांचा या मतदारसंघावर चांगला प्रभाव आहे. त्यांच्या विरोधात भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी यावेळी चांगली तयारी केली आहे. जयंत पाटील यांच्या विरोधात सर्वपक्षीय विरोधक एकत्रित करून एक उमेदवार देण्याच्या हालचाली सुरू आहेत.
या मतदारसंघावर राष्ट्रवादी अजितदादा पवार यांच्या गटानेही दावा सांगितला आहे. त्यामुळे ही जागा राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाला गेल्यास जयंत पाटलांचे पारंपरिक विरोधक अजितदादा पवार गटात प्रवेश करून निवडणूक लढवतील. हे जरी असले तरी जयंत पाटलांच्या विरोधात उमेदवार कोण हे निवडणूक जाहीर झाली तरी निश्चित झालेले नाही. त्यामुळे त्यांना इस्लामपूर मतदारसंघातच रोखण्यासाठी भाजप, एकनाथ शिंदे गट व अजितदादा गट प्रयत्नशील राहतील यात शंका नाही.