निवडणुकीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शाळांना……..विद्यापीठालाही २० नोव्हेंबरला

विधानसभा निवडणुकीसाठी २० नोव्हेंबरला (बुधवारी) जिल्ह्यातील तीन हजार ७२३ केंद्रांवर मतदान होत आहे. जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या १३५९ शाळांमध्ये अडीच हजार मतदान केंद्रे आहेत.दुसरीकडे बहुतेक शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी असल्याने १९ व २० नोव्हेंबरला जिल्हा परिषदेच्या शाळांसह खासगी प्राथमिक शाळांना सुटी असणार आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या आदेशावरून प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी सर्व शाळांसाठी तसे आदेश काढले आहेत. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक सुरळीतपणे पार पाडण्यासाठी शिक्षकांच्या निवडणूक कर्तव्यांमुळे ज्या ठिकाणी शाळा भरविणे शक्य नसेल, त्या ठिकाणी संबंधित खासगी प्राथमिक शाळांच्या मुख्याध्यापकांनी १९ व २० नोव्हेंबर रोजी शाळा बंद ठेवण्याचा निर्णय त्यांच्या स्तरावर घ्यावा, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

तर जिल्हा परिषदेच्या शाळांसाठीही हा निर्णय लागू असणार आहे. पण, ज्या शाळांमधील शिक्षकांना विशेषत: दिव्यांग किंवा ५३ वर्षांवरील शिक्षकांना इलेक्शन ड्यूटी आलेली नाही आणि त्या शाळेत मतदान केंद्र देखील नाही, अशा शाळा सुरु ठेवता येतील, असेही शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. रविवारी १७ नोव्हेंबरला शाळांना सुटी असणार आहे आणि त्यानंतर मंगळवार व बुधवारी देखील मतदानामुळे सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे बहुतेकजण सोमवारी (ता. १८) एक दिवस शाळेत येण्यापेक्षा रजाच घेतील, अशी शक्यता आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला विधानसभा निवडणुकीच्या मतदानादिवशी म्हणजेच २० नोव्हेंबरला सुटी राहील, असे प्र कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा यांनी सांगितले. याशिवाय संलग्नित उच्च महाविद्यालयांनाही त्या दिवशी सुटी असणार आहे. त्यानंतर २६ नोव्हेंबरपासून विद्यापीठाची सत्र परीक्षा सुरु होणार आहे. विद्यापीठाला सुटी देण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश बंधनकारक असतात, पण तसे आदेश नसल्याने केवळ २० नोव्हेंबरलाच विद्यापीठ व संलग्नित उच्च महाविद्यालयांनाही सुट्टी असणार आहे.