केंद्राची 7 लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती 15 दिवसांत मिळणार

राज्यातील तब्बल 7 लाख विद्यार्थ्यांची शिष्यवृत्तीची रक्कम केंद्र शासनाने दोन वर्ष रखडवल्याचा आरोप करत विरोधकांनी सत्ताधार्‍यांना धारवेवर धरले. त्याचप्रमाणे शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करण्याची मागणी केली.तसेच न्यायालयाने शिष्यवृत्तीच्या रक्कमेबाबत निर्णय दिल्यामुळे विद्यार्थ्यांच्या खात्यावर तात्काळ रक्कम जमा करावी, अशी मागणी करण्यात आली.

त्यावर पुढील 15 दिवसात शिष्यवृत्तीची रक्कम विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाईल, अशी घोषणा मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली.शिष्यवृत्तीच्या प्रश्वावर विरोधकांनी सरकारची कोंडी केली. आमदार लहू कानडे यांनी शिष्यवृत्तीचा विषय मांडला. आमदारांनी उपस्थित केल्या प्रश्नावर मंत्री गुलाबराव पाटील यांनी उत्तर दिले. ते म्हणाले, राज्याने 40 टक्के रक्कम दिली आहे.

यासंदर्भातील निकाल 5 डिसेंबर रोजी लागला आहे. मात्र, केंद्र शासनाकडून दिली जाणारी 60 टक्के रक्कम वितरित करायची बाकी आहे. राज्य शासनाने आपला 40 टक्के हिस्सा दिला आहे. सुमारे 900 कोटी रुपयांच्या निधीबाबत केंद्र शासनाने माहिती मागवली आहे. त्यामुळे लवकरच शिष्यवृत्तीच्या रक्कमेचे वितरण सुरू होणार आहे.

ही रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होणार आहे.काही शिक्षण संस्थांचालकांच्या तक्रारी होत्या की शिष्यवृत्तीची रक्कम केवळ विद्यार्थ्यांच्या खात्यावर जमा होते. त्यामुळे संस्थाचालकांना रक्कम मिळत नाही. संस्थांचालकांचे नुकसान होते. मात्र, न्यायालयाने अभ्यास केला तेव्हा त्यांना इतर राज्यांमध्ये बोगस विद्यार्थी दिसून आले. त्यामुळे ही रक्कम थेट विद्यार्थ्यांना दिली जाते.

मात्र, विद्यार्थी संस्था चालकांना रक्कम देत नसल्याने पत्रक काढले जाईल, विद्यार्थ्यांना रक्कम मिळाल्यानंतर त्यांनी आठ दिवसात संस्थाचालकांना रक्कम द्यावी,असेही गुलाबराव पाटील म्हणाले. या चर्चेत विजय वडेट्टीवार, प्रा. वर्षा गायकवाड, राजेश टोपे सहभागी झाले होते.