खानापूर मतदारसंघामध्ये होत असलेल्या तिरंगी लढतीत दोन माजी आमदारपुत्रांचा एका माजी आमदारांशी सामना अंतिम टप्प्यात रंगतदार बनला आहे. या मतदारसंघामध्ये गेल्या तीन निवडणुका बाबर विरुद्ध पाटील अशा पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच झाल्या आहेत. यामुळे यावेळीही अशीच लढत होईल अशी अपेक्षा असताना अखेरच्या टप्प्यात आटपाडीच्या देशमुखांनी रणमैदानात उतरण्याचे जाहीर केले. उमेदवारीसाठी त्यांनी भाजपचा त्याग करत राष्ट्रवादीचे अध्यक्ष खा. शरद पवार यांची भेट घेतली. या पक्षाची उमेदवारी मिळणार नाही हे स्पष्ट होताच त्यांनी अपक्ष उमेदवारी दाखल करून राजकीय अंदाज धुळीस मिळवले.
दुसर्या बाजूला उमेदवारीच्या संघर्षात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) गटाचे जिल्हाध्यक्षपद सोडून वैभव पाटील यांनी तुतारी वाजवत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाची उमेदवारी घेतली. उमेदवारीसाठी कोणत्याही पक्षात जाण्याची त्यांची तयारी होती. प्रसंगी अपक्ष म्हणून मैदानात उतरण्याची तयारीही त्यांनी केली होती. यासाठी आटपाडीत मित्रही शोधले होते.
मात्र, अखेरच्या टप्प्यात देशमुखांची उमेदवारी समोर आल्याने त्यांनाही स्वबळाचा अंदाज नव्याने घ्यावा लागत आहे. तासगाव तालुक्यात संजयकाका पाटील यांची ताकद सोबतीला मिळण्याची आशा असली तरी तेथेही आबा गटाकडून बाबरांना मदत होण्याची शक्यता आहे.या निवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बंद पडलेल्या माणगंगा कारखान्याचे धुराडे मीच पेटवणार असे सांगितल्याने पाटील गटाची कोंडी झाली.
या कोंडीतून बाहेर पडण्यासाठी आमदार पाटील यांना दुसर्यांदा सभा घेऊन खुलासा करावा लागला. देशमुख गटाला परत फिरा म्हणून आर्जवे करावी लागली. यामुळे देशमुख गटातील धाकटी पाती म्हणून ओळख असलेल्या अमरसिंह देशमुखांनी आता ताकद दाखविण्याचा चंग बांधला आहे. देशमुखांचा खानापूर तालुक्यातील बाबर व पाटील गटावर नाराज असलेल्या मतावंर डोळा आहे, तर बाबरांचे स्वत:चा गट शाबूत ठेवत आटपाडीतून जास्तीत जास्त मतदान आपणास कसे होईल याकडे लक्ष आहे. पाटील गटाचे विटा शहरात वर्चस्व असले तरी त्यांनाही आटपाडीमध्ये नवे मित्र शोधावे लागत आहेत. या साठमारीत कोण कुणाच्या ताटातील आणि किती पळवते यावर निकालाचा कल ठरणार आहे.