सांगोला तालुक्यात प्रथमच अतिशय रंगतदार तिरंगी लढत लागली आहे. आमदार शहाजीबापू पाटील, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांकडून माजी आमदार दीपक साळुंखे-पाटील तर शेतकरी कामगार पक्षाने डॉ. बाबासाहेब देशमुख यांना उमेदवारी दिली आहे.एकीकडे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार दीपकआबा असले तरी दुसरीकडे शेकापसाठी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील प्रचार करीत आहेत.त्यामुळे येथे महायुती किंवा महाविकास आघाडी असा दोन राज्यस्तरीय सामना नसून येथे उमेदवाराच्या पक्षांपेक्षा गटामध्येच सामना रंगला आहे.
विधानसभेसाठी नेहमी दुसऱ्यांना पाठिंबा देणारे दीपकआबा यावेळी मी समोरच्या दोन्ही उमेदवारांना, त्यांच्या पक्षाला या अगोदर साथ दिल्याने त्यांनी मला एक वेळ मला संधी द्यावी, असे सांगत विधानसभेच्या मैदानात उतरले. त्यांच्या मतांच्या गोळाबेरीजेवर येथील विजयाचे गणित अवलंबून असणार आहे.
या आधीच्या निवडणुकांमध्ये उमेदवार जरी जास्त असले तरी सामना हा दुरंगीच लढला जात होता. माजी आमदार साळुंखे-पाटील दोन्हीपैकी कोणत्यातरी एका पक्षाला पाठिंबा देत असल्यामुळे येथे दुरंगी लढती पाहिल्या आहेत. परंतु यावेळी साळुंखे-पाटील प्रथमच मैदानात असल्याने तिरंगी लढतीचा नेमका फायदा-तोटा कोणाला होणार, याकडे तालुक्यात जोरदार चर्चा सुरू आहे.