राज्यातील शेतकऱ्यांना दुधासाठी प्रति लिटर १० रुपये अनुदान तात्काळ देण्यात यावे , अशी मागणी पावसाळी अधिवेशनात आ. डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी केली . लवकरच हे अनुदान (Subsidy) देण्याचे शासनाने मान्य केलेले असल्याची माहिती आ. देशमुख यांनी दिली.
आ. देशमुख यांनी सांगोला मतदारसंघातील विविध प्रश्न विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात उपस्थित होते. रस्त्यांची दुरवस्थेमुळे ग्रामीण भागातील दळणवळण विस्कळीत होत असल्याने निधीची मागणी केली. त्यानुसार पुरवणी मागण्यांमध्ये मंजुरी देण्यात आली आहे. सांगोला तालुक्यात डाळिंब व द्राक्षापासून वाईन तयार करण्यासाठीचे उद्योग सुरु करावेत अशी त्यांनी मागणी केली . त्यासाठीही शासनाने सकारात्मकता दर्शवली असून निधीची तरतूद करण्यात आली आहे. सोलापूर जिल्ह्यात केंद्रीय डाळिंब संशोधन केंद्र २००५ पासून कार्यान्वित आहे, परंतु आजतागायत नवीन वाण निर्माण करण्यात अपयश आलेले आहे. या केंद्रात नवीन डाळिंब वाण निर्मितीसाठी बीज परीक्षण प्रयोगशाळेचे बळकटीकरण आवश्यक असून त्यासाठी निधीची मागणी आ. देशमुख यांनी केली. शासनाने त्यास मान्यता दिली. सांगोला शहरातील भूमिगत गटारी राज्य उत्पादन शुल्क कार्यालयासाठी प्रशासकीय इमारत बांधकाम , ग्रामीण रुग्णालय येथील इमारतीचे नूतनीकरण ,अधिकारी , कर्मचारी निवास्थानाचे बांधकाम , अंतर्गत रस्ते , संरक्षण भिंत बांधणे यासाठी निधीची मागणीही त्यांनी केली. त्यानुसार शासनाने निधीची तरतूद केली असल्याचे आ. देशमुख यांनी सांगितले.
