सांगली जिल्ह्यात प्रचारतोफा थंडावल्या! उद्या मतदान…..

विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारी (20 नोव्हेंबर) मतदान होत असून गेले तीन आठवडे धडाडत असलेल्या प्रचाराच्या तोफा सोमवारी सायंकाळी थंडावल्या. भव्य रॅली, पदयात्रा, जाहीर सभांच्या धडाक्यात प्रचाराचा समारोप झाला.आता मतदानापर्यंत छुपा प्रचार चालणार असल्याचे चित्र दिसत आहे.

जिल्ह्यात विधानसभेच्या आठही मतदारसंघांत यावेळी अटीतटीची निवडणूक होत आहे. या निवडणुकीने महाविकास आघाडी आणि महायुतीची जिल्ह्यातील ताकद स्पष्ट होणार आहे. प्रमुख नेत्यांच्या नेतृत्वाचाही कस लागणार असल्याने ही निवडणूक प्रचंड चुरशीने होत आहे. गेले तीन आठवडे जिल्ह्यात प्रचाराची रणधुमाळी उडाली होती. मतदारांच्या भेटीगाठी, रॅली, पदयात्रा, प्रचार सभा, बैठकांनी निवडणुकीचे वातावरण चांगलेच तापलेे.

महाविकास आघाडी आणि महायुतीचे वरिष्ठ नेते जिल्ह्यात प्रचारात उतरले होते. आरोप-प्रत्यारोप आणि विकासकामांच्या आश्वासनांनी राजकारण ढवळून निघाले. सोमवारी सायंकाळी सहा वाजता जाहीर प्रचाराची सांगता झाली.सांगली जिल्ह्यातील सर्व आठही मतदारसंघात मोठ्या चुरशीने निवडणूक होत आहे. प्रचार चुरशीने, ईर्षेने झाला. तीच चुरस आणि ईर्षा मतदानातही दिसून येईल, असे चित्र दिसत आहे. यावेळी मतदानाचा टक्का वाढणार, असेही चित्र दिसत आहे. जास्तीत जास्त मतदान व्हावे, यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी पुरेपूर दक्षता घेतली आहे.