दहा वर्षांतील सरकारच्या सत्तेत हिंदू खतरे में कसा, जयंत पाटील यांचा सवाल

देशात व राज्यात १० वर्षांपासून तुमचे सरकार आहे, मग हिंदू खतरे में कसा आला? असा सवाल वाळवा तालुक्यातील बोरगाव येथील जाहीर सभेत जयंत पाटील यांनी केला. इस्लामपूर मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार जयंत पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा बोरगाव येथे घेण्यात आली. यावेळी राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, महानंदचे माजी अध्यक्ष विनायक पाटील, विष्णुपंत शिंदे, नेताजीराव पाटील, सुश्मिता जाधव उपस्थित होते.

जयंत पाटील म्हणाले, आपल्या आशीर्वादाने ३५ वर्षे आमदार आणि त्यातील साडेसतरा वर्षे राज्यात मंत्री म्हणून काम केले. मात्र इतक्या वर्षांत एकही काम तुम्हाला मान खाली घालावे लागेल, असे माझ्या हातून झालेले नाही. उलट तुम्हाला अभिमान वाटेल, तुमची मान ताठ होईल, असेच काम मी केले आहे.

आज युवकांच्या हाताला काम हवे आहे. महागाई, भ्रष्टाचार, महिलांवरील अत्याचार असे कितीतरी प्रश्न असताना भाजपा कंटेंगे-बटेंगेची भाषा करीत आहे. शेती मालाचे दर वाढविले, तर महागाई वाढते, ही या सरकारची मानसिकता आहे. हे शेतकरी विरोधी सरकार आहे.

महाराष्ट्रातील मोठे उद्योग व अनेक कार्यालये गुजरातला पळविल्याने गुजरात राज्य दरडोई उत्पन्नामध्ये पुढे गेले आहे. हे राज्य पुन्हा जातीयवादी पक्षांच्या हातात देणार का, शिव-शाहू-फुले-आंबेडकर यांच्या बहुजन हिताच्या विचारांच्या माणसांच्या हातात देणार? याचा निर्णय आपणास या विधानसभा निवडणुकीत घ्यायचा आहे.