२०२४ मध्ये अनेक मोठ्या बजेटच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत होते. प्रभासचा ‘सालार’, सूर्या आणि बॉबी देओल स्टारर ‘कंगुवा’ आणि हिंदीतील ‘सिंघम अगेन’ यांसारख्या चित्रपटांच्या यादीत अल्लू अर्जुनचा बहुचर्चित चित्रपट ‘पुष्पा २’ देखील आहे.या बहुचर्चित सिनेमाचा ट्रेलर १७ नोव्हेंबर २०२४ रोजी बिहारच्या पाटणामध्ये लॉन्च करण्यात आला. ट्रेलरमध्ये अल्लू अर्जुनच्या ‘पुष्पा’ या पात्राची दमदार अॅक्शन पाहायला मिळाली होती. या चित्रपटात रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल हे देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. प्री-बुकिंगमध्ये सिनेमाने चांगली कमाई केली असून आता या सिनेमाचे डिजिटल हक्कांची विक्री झाली असून त्याचेही आकडे समोर आले आहेत.
बहुतेक प्रेक्षक अनेकदा थिएटरमध्ये चित्रपट पाहू शकत नाहीत, त्यानंतर अशा प्रेक्षकांना ओटीटीवर चित्रपट पाहण्याची संधी मिळते. चित्रपट थिएटरमध्ये रिलीज झाल्यानंतर काही दिवसांतच ओटीटीवर प्रदर्शित होतात. यामुळे चित्रपट निर्मात्यांना चांगलाच फायदा होतो, कारण चित्रपटाचे टेलिव्हिजन आणि ओटीटी राइट्स आधीच विकले जातात. यामधून निर्मात्यांना कोट्यवधींची रक्कम मिळते.सॅकनिल्कच्या अहवालानुसार, ‘पुष्पा २’चे डिजिटल राइट्स नेटफ्लिक्सने तब्बल २७५ कोटींना खरेदी केले आहेत.
त्यामुळे हा सिनेमा नेटफ्लिक्सवर पाहण्याची संधी मिळणार आहे. मात्र, याबाबत निर्मात्यांनी अद्याप अधिकृत घोषणा केलेली नाही.’ॲमेझॉन प्राईम व्हिडीओ’ने ‘टायगर ३’चे ओटीटी तब्बल २०० कोटींना विकत घेतले होते. तर, ‘पठाण’चे ओटीटी राइट्स १०० कोटींना विकत घेतले होते. तर या चित्रपटांच्या दुप्पट किमतीने ‘पुष्पा २’चे ओटीटी अधिकार विकले गेले आहेत. त्यामुळे प्रदर्शनाआधीच ‘पुष्पा २’ने या चित्रपटांना मागे टाकलं आहे.
‘पुष्पा २’ हा चित्रपट ५ डिसेंबर २०२४ रोजी सिनेमागृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. विशेष म्हणजे याच्या युएसएमधील प्री-बुकिंगला सुरुवात झाली आहे. या सीक्वलमध्ये फहाद फासिल आणि अल्लू अर्जुन यांची जोरदार टक्कर पाहायला मिळणार आहे, ज्यामुळे हा चित्रपट आणखी रोमांचक ठरणार आहे.