टीम इंडियाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याची सुरुवात 22 नोव्हेंबरपासून होणार आहे. दोन्ही टीम्समध्ये पाच टेस्ट मॅचची सीरीज होईल. या मालिकेला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी नाव देण्यात आलय. सीरीजमधला पहिला सामना पर्थच्या ऑप्टस स्टेडियममध्ये होणार आहे. या मालिकेला सुरुवात होण्याआधी टीम इंडियाच्या खेळाडूशी संबंधित एक बातमी समोर आली आहे. हा खेळाडू काही काळापासून दुखापतीचा सामना करत होता. दुखापतीमुळेच भारतीय सिलेक्टर्सनी त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीममध्ये निवड केली नाही. या खेळाडूवर परदेशात सर्जरी झाली आहे. लवकरच तो मैदानात पुनरागमन करेल.
टीम इंडियाचा स्टार स्पिनर कुलदीप यादव बऱ्याच काळापासून ग्रोइन इंजरीमुळे त्रस्त होता. याच दुखापतीमुळे न्यूझीलंड विरुद्धच्या संपूर्ण मालिकेला तो मुकला. ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी टीमची निवड करताना कुलदीप ग्रोइन इंजरीचा सामना करत असल्याच बीसीसीआयकडून सांगण्यात आलं होतं. त्यामुळे त्याचा स्क्वॉडमध्ये समावेश करण्यात आला नाही. कुलदीप यादवला सर्जरी करुन घ्यावी लागेल अशी बातमी आली होती. आता त्याची सर्जरी झाली असून त्याची माहिती त्याने दिली आहे.
कुलदीप यादवच्या ग्रोइन इंजरीवर जर्मनीमध्ये सर्जरी झाली आहे. त्याने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर जर्मनीचे काही फोटो शेअर केले आहेत. यात एक फोटो सर्जरी नंतरचा आहे. या फोटोज सोबत त्याने कॅप्शनमध्ये लिहिलय ‘चांगल्या प्रकृतीसाठी मुंचनेमध्ये काही दिवस’. मुंचेन जर्मनीच एक शहर आहे. म्यूनिख या नावाने ते ओळखलं जातं. म्यूनिखला जर्मनीमध्ये मुंचने म्हटलं जातं. कुलदीप यादववर 2021 मध्ये सुद्धा एक सर्जरी झाली होती. त्यावेळी कुलदीप यादवच्या गुडघ्याच ऑपरेशन झालं होतं.
कुलदीप यादव न्यूझीलंडच्या सीरीजनंतर बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये गेलेला. कारण त्याला रिहॅबिलिटेशनचा सल्ला देण्यात आला होता. सर्जरीनंतरही त्याला रिहॅबिलिटेशन प्रोसेसमधून जावं लागेल. भारतात परतल्यानंतर तो बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सीलेंसमध्ये जाईल. कुलदीपला मैदानावर पुनरागमनासाठी काही काळ लागणार आहे. तो मैदानावर कधी परतणार? हे आत्ताच सांगता येणार नाही.