पहिल्या टी-२० सामन्यात भारताचा विजय! ६ विकेट राखून मात

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने अफगाणिस्तानविरुद्ध टी-२० मालिकेची सुरुवात विजयाने केली आहे. मोहालीच्या मैदानात खेळवण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात भारताने ६ गडी राखून विजय मिळवत मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.नाणेफेक जिंकून रोहित शर्माने पहिल्यांदा गोलंदाजीचा निर्णय घेतला. रेहमानउल्ला गुरबाझ आणि इब्राहीम झरदान जोडीने अफगाणिस्तानला चांगली सुरुवात करुन दिली. दोघांनीही पहिल्या विकेटसाठी ५० धावांची भागीदारी केली.

अक्षर पटेलने रेहमानउल्ला गुरबाझला बाद करत भारताला पहिलं यश मिळवून दिलं. त्यानंतर लगेच दुसऱ्या षटकात शिवम दुबेने कर्णधार इब्राहीम झरदानला बाद केलं. या धक्क्यातून अफगाणिस्तानचा संघ सावरतो न सावरतो तोच अक्षर पटेलने रेहमत शहाचा अडसर दूर केला.३ बाद ५७ अशा अवस्थेतून अझमतउल्ला ओमराझी आणि मोहम्मद नबी यांनी अफगाणिस्तानच्या डावाला आकार दिला. दोघांनीही चांगली फटकेबाजी करत चौथ्या विकेटसाठी ६८ धावांची भागीदारी केली.

अपगाणिस्तानने शतकी धावसंख्येचा टप्पा ओलांडल्यानंतर मुकेश कुमारने ओमराझीला बाद केलं. त्याच षटकात मोहम्मद नबीही मुकेशच्या गोलंदाजीवर बाद झाला. नबीने ४२ तर ओमराझीने २९ धावा केल्या. यानंतर नझीबउल्ला झरदान आणि करीम जनत जोडीने फटकेबाजी करुन अफगाणिस्तानला १५८ धावांपर्यंत मजल मारुन दिली.

भारताकडून मुकेश कुमार आणि अक्षर पटेलने प्रत्येकी २-२ तर शिवम दुबेने १ विकेट घेतली.१५९ धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवातही फारशी चांगली झाली नाही. दुसऱ्याच चेंडूवर रोहित शर्मा चोरटी धाव काढण्याच्या नादात भोपळाही न फोडता धावबाद झाला. शुबमन गिल आणि तिलक वर्माने दुसऱ्या विकेटसाठी २८ धावांची छोटेखानी भागीदारी केली.

ही जोडी मैदानावर टिकतेय असं वाटत असतानाच मुजीब उर रेहमानच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात शुबमन गिल यष्टीचीत झाला.यानंतर शिवम दुबेच्या साथीने तिलक वर्माच्या जोडीने पुन्हा एकदा भारताचा डाव सावरला. तिसऱ्या विकेटसाठी दोघांनीही ४४ धावांची भागीदारी केली. अझमतउल्ला ओमराझीने तिलक वर्माला बाद करत भारताची ही जोडी फोडली.

यानंतर शिवम दुबेने जितेश शर्माच्या साथीने पुन्हा एक महत्वाची भागीदारी करत आपलं अर्धशतक पूर्ण केलं. दोघांनीही चौथ्या विकेटसाठी ४५ धावा जोडल्या. ही जोडी भारताला विजय मिळवून देणार असं वाटत असतानाच मुजीब उर रेहमानने जितेश शर्माला बाद केलं.

यानंतर शिवम दुबेने रिंकू शर्माच्या साथीने उर्वरित धावा पूर्ण करत भारताला विजय मिळवून दिला. शिवम दुबेने ४० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकार लगावत नाबाद ६० धावा केल्या. रिंकूने नाबाद १६ धावा केल्या. अफगाणिस्तानकडून मुजीब उर रेहमानने २ तर अझमतउल्ला ओमराझीने १ विकेट घेतली.