विधानसभा निवडणुकीचा निकाल उद्या जाहीर होत आहे. काय झाडी, काय डोंगर या शहाजीबापू पाटील यांच्या वक्तव्याने नावाजलेल्या सांगोला मतदारसंघात यावेळी शिंदे सेनेची जादू फारशी चालताना दिसणार नाही. समुहाच्या एक्झिट पोलमधून मतदारांचा कौल काही वेगळाच बघायला मिळाला आहे.
सांगोला विधानसभा मतदारसंघात सध्या शिंदे गटाचे शहाजीबापू पाटील हे आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत याठिकाणी तिरंगी लढत बघायला मिळणार आहे. याठिकाणी शिंदेसेने कडून शहाजीबापू यांना उमेदवारी मिळाली आहे. तर शेकापकडून बाबासाहेब देशमुख हे निवडणूक रिंगणात आहे. ठाकरे गटाने देखील या ठिकाणी दीपक साळुंके यांना उमेदवारी दिलेली असल्याने ही तिरंगी लढत रंगणार आहे.
एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार याठिकाणी संभाव्य आमदार म्हणून शेकापचे बाबासाहेब देशमुख यांना मतदारांची पसंती मिळताना दिसत आहे. सांगोला मतदारसंघात बाबासाहेब देशमुख यांचा जनसंपर्क दांडगा आहे. एकीकडे शहाजीबापू पाटील यांनी आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. तर दुसरीकडे बाबासाहेब देशमुख यांच्या अस्तित्वाची ही लढाई असल्याने या मतदारसंघाचा निकाल काय लागतो याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. सध्या तरी संभाव्य आमदार म्हणून बाबासाहेब देशमुख यांच्या नावाला पसंती मिळताना दिसत आहे.