महागाईने सध्या उच्चांक गाठला असून दैनंदिन जीवनातील प्रत्येकाला लागणारा स्वयंपाकातील लसणाला तब्बल ४०० रुपये किलोच्या महागाईची फोडणी मिळाली आहे. सध्या लसणासाठी किलो मागे ४०० रुपये मोजावे लागत असून लसणाचे भाव अजून वधारण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.सध्या वाढत्या महागाईने सर्वसामान्यांना घाम फोडला आहे. त्यातच लसणाचे भाव ४०० च्या घरात पोहोचल्याने गृहिणींना लसणाची फोडणी देणे महागात पडत आहे. परिणामी स्वयंपाकघरातील लसणाच्या फोडणीचा वास लुप्त होण्याच्या मार्गावर आहे.
लसणाची दिवसागणिक दरवाढ सुरू असून वाशीमसह विदर्भातील अनेक जिल्ह्यामधे येत्या काही दिवसांत लसणाचा भाव किलो मागे ५०० रुपयावर पोहोचण्याची शक्यता असल्याचे भाजीविक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे.लसणाचा भाव ४०० रुपयापर्यंत आहे. पावाला १०० तर किलोला ४०० रुपये मोजावे लागत आहे. बाहेरून येणाऱ्या लसणाला यावर्षी अवकाळी पावसाचा फटका सहन करावा लागल्याने लसणाचे भाव वाढले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवस आधी फोडणीत मानाचे स्थान असलेल्या लसणाला व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणार आहे.
पुढचे काही दिवस लसणाचे भाव वाढीव राहणार असल्याने सामान्यांच्या खिशाला लसण खरेदी करताना कात्री लागणार आहे.सध्या खाद्यतेलाच्या किमतींमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच दिवसेंदिवस अन्य जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत देखील वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे महिन्याचे बजेट कोलमडले आहे. खाद्यतेलाच्या दरात वाढ केल्यामुळे आता सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणार आहे. तेलाचे भाव एका किलो मागे तब्बल २५ ते ३० रुपयांनी वाढले आहेत.
केंद्र सरकारने कच्च्या आणि रिफाइंड खाद्यतेलांवरील मूळ आयात करावर २० रुपयांनी वाढ केली आहे. तसेच दोन टक्के सेल्स असे २२ टक्के वाढ करण्यात आली आहे. याचाच फटका खाद्यतेलाच्या दरावर झाला आहे. मात्र, याचा सामना सर्वसामान्य ग्राहकांना करावा लागत आहे.
कच्चे सोयाबीन, पाम तेल, सूर्यफूल तेलावरील आयात शुल्कात २० टक्के वाढ, तर रिफाइंड सूर्यफूल, सोयाबीन तेलावरील आयात शुल्क ३५.७५ टक्के वाढवले आहे. ग्राहक खरेदी करत असलेल्या सोयाबीन तेलाचा किरकोळ दर आतापर्यंत ११० रुपये प्रति लिटर होता. तो दर आता १२५ रुपयांच्या घरात गेला आहे. १५ किलो डब्यामागे सरासरी १५० ते २०० रुपये वाढले आहेत.