विधिमंडळामध्ये आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला तालुक्यातील अनेक प्रश्नांना फोडली वाचा

सांगोला विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक प्रश्नांना वाचा फोडलेली आहे. त्यांनी सांगोला तालुक्यातील मागील पाच वर्षात आरोग्य व्यवस्था सलाईनवर आलेली आहे आरोग्यवस्थेच्या सेवा सुविधेचे तीन तेरा वाजल्यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह गोरगरिबांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे आणि हीच आरोग्य व्यवस्था सुरळीत करून गोरगरीब नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेता यावा यासाठी आरोग्यवस्थेसंबंधी सांगोल्याचे नवनियुक्त आमदार बाबासाहेब देशमुख यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले.

सांगोला तालुक्यातील आरोग्य सेवेच्या प्रश्नांकडे सरकारचे लक्ष त्यांनी घेरलेले आहे त्यावर उपाययोजना करण्याची मागणी देखील त्यांनी केलेली आहे. तसेच सांगोला तालुक्यातील अकोला व कोळा प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारती अत्यंत नादुरुस्त झालेली आहेत आणि या इमारती पावसाळ्यामध्ये गळतात त्यामुळे येथील कर्मचारी व रुग्णांचे हाल होत आहे त्यामुळे या इमारतींसाठी ताबडतोब निधी मिळावा.

सांगोला शहरात ट्रॉमा सेंटरला परवानगी मिळाली व आज त्याची भव्य इमारत पूर्ण होऊन डॉक्टर व कर्मचारी नसल्याने हे ट्रॉमा सेंटर बंद अवस्थेत आहे तर या ठिकाणी कर्मचाऱ्यांची व डॉक्टरांची नेमणूक करून त्यांचे लोकार्पण करावे. तसेच मोडशिंगी गावातील प्राथमिक आरोग्य केंद्राचे तीन वेळा उद्घाटन होऊन सुद्धा कर्मचारी व डॉक्टरविना हे आरोग्य केंद्र बंद आहे. अशीच अवस्था खिलारवाडी, बंडगरवाडी व हलदहिवडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची आहे. या ठिकाणी झाडे उगवली आहेत तर ही प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करावेत व रुग्णांना दिलासा द्यावा अशी मागणी त्यांनी यावेळेस विधिमंडळात केलेली आहे.

सांगोला शहरांमध्ये सध्या भूमिगत गटारीचे काम सुरू असून ते काम उत्तम दर्जाचे व्हावे व गटारीची कामे करताना खोदलेले शहरातील अंतर्गत रस्ते दुरुस्त करून द्यावेत त्याचप्रमाणे सांगोला नगरपरिषदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासाठी दहा कोटींचा निधी उपलब्ध असून ते काम त्वरित सुरू करावे अशी मागणी देखील त्यांनी केलेली आहे. निवडणुकीच्या कालावधीमध्ये बाबासाहेब देशमुख यांनी निवडणुकीनंतर सांगोला तालुक्यातील आरोग्य सेवा सुरळीत करण्यासाठी हवे ते प्रयत्न करू असे आश्वासन दिले होते आणि ते आश्वासन पूर्ण करण्यासाठी त्यांनी पहिल्याच अधिवेशनामध्ये तालुक्यातील खुळखुळीत झालेल्या आरोग्य सेवेचा प्रश्न मांडून आरोग्य सेवा सुलभ, सक्षम बनवण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यासाठी मागणी केलेली आहे.