कार्तिकी यात्रा आणि संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संजीवन समाधी सोहळ्यासाठी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी आळंदीत दाखल झाले आहेत. कार्तिकी एकादशीनिमित्त वारकऱ्यांनी आज माऊलींच्या समाधीचे दर्शन घेऊन शेतकऱ्याला सुगीचे दिवस यावेत, सरकारने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, सरकारला सद्बुद्धी द्यावी असे साकडे घातले.
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी यात्रेनिमित्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविक ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या जयघोषात दाखल झाले आहेत. पवित्र इंद्रायणीत स्नान करून माऊलींच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी वारकरी दर्शनरांगेत लागले आहेत. दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील भाविक मोठ्या प्रमाणावर आले आहेत.
यावेळी माऊलींच्या समाधीचं दर्शन घेऊन आलेल्या वारकऱ्यांनी भावना व्यक्त करत ह्या सरकारला सद्बुद्धी द्यावी, त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घ्यावेत, शेतकऱ्यांना सुगीचे दिवस यावेत असे साकडे घातल्याचे म्हटले आहे. नुकतंच, आस्मानी संकटाने शेतकरी संकटात सापडला. अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली होती. अनेक शेतकरी अद्यापही सरकारी मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.