वर्ष आता संपत आलं आहे. भारताने या वर्षामध्ये विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात कित्येक नवीन विक्रम केले. देशाची अंतराळ संशोधन संस्था, म्हणजेच इस्रोसाठी तर हे वर्ष अगदीच खास ठरलं.चांद्रयान-3, आदित्य एल-1 या दोन मोहिमांच्या माध्यमातून भारताने इतिहास रचला. यासोबतच इस्रोने आणखी काही मोहिमा देखील यशस्वीपणे पार पाडल्या. यावर्षी इस्रोने सात मोहिमांचे यशस्वी लाँचिंग केले. सोबतच अमेरिका, ब्रिटन आणि सिंगापूर देशांचे उपग्रह देखील इस्रोने अवकाशात लाँच केले. इस्रोने यावर्षी कोणत्या मोहिमा फत्ते केल्या, याबाबत आपण माहिती घेणार आहोत.
10 फेब्रुवारी 2023 या दिवशी स्मॉल सॅटेलाईट लाँच व्हेईकल SSLV-D2 चे यशस्वी लाँचिंग करण्यात आले. या मोहिमेच्या माध्यमातून EOS-07, Janus-1 आणि AzaadiSAT-2 हे तीन उपग्रह पृथ्वीच्या 450 किलोमीटर कक्षेत प्रस्थापित करण्यात आले. यातील Janus-1 हा उपग्रह अमेरिकेचा होता. EOS-07 हा सुमारे दीडशे किलोचा उपग्रह इस्रोने तयार केला होता. तर आझादी सॅट-2 हा उपग्रह स्पेस किड्स इंडिया या संस्थेच्या माध्यमातून देशभरातील 750 विद्यार्थिनींनी तयार केला होता.
26 मार्च रोजी इस्रोच्या LVM3 या रॉकेटच्या मदतीने वन वेब ग्रुप कंपनीचे तब्बल 36 उपग्रह पृथ्वीपासून 450 किलोमीटर उंचीवरील कक्षेत प्रस्थापित केले. या सर्व उपग्रहांचं वजन तब्बल 5,805 किलो एवढं होतं.
22 एप्रिल 2023 रोजी PSLV-C55/TeLEOS-2 ही मोहीम यशस्वीपणे पार पाडण्यात आली. यामध्ये TeLEOS-2 हा मुख्य उपग्रह आणि Lumelite-4 हा पॅसेंजर उपग्रह अवकाशात प्रक्षेपित कऱण्यात आले. हे दोन्ही उपग्रह सिंगापूरचे होते. या दोन्ही उपग्रहांचं एकत्रित वजन सुमारे 750 किलो होतं.
29 मे 2023 रोजी इस्रोने NVS-01 हा नॅव्हिगेशन सॅटेलाईट जिओसिंक्रोनस ट्रान्सफर ऑर्बिटमध्ये प्रस्थापित करण्यात आला. NAVIC या नॅव्हिगेशन उपग्रह शृंखलेतील हा पहिला सेकंड-जनरेशन उपग्रह होता. याचं वजन सुमारे 2,232 किलो होतं.
चांद्रयान-2 मोहीम अगदी अखेरच्या टप्प्यात जाऊनही अयशस्वी झाली होती. मात्र, त्यानंतर दुसऱ्याच दिवशीपासून चांद्रयान-3 मोहिमेची तयारी सुरू करण्यात आली होती. यावर्षी जानेवारी महिन्यापासूनच चांद्रयानातील उपकरणांची निर्मिती आणि चाचणी यांना वेग आला होता. अखेर सर्व चाचण्या आणि रंगीत तालीम पार पाडल्यानंतर 14 जुलै 2023 रोजी या दिवशी ‘चांद्रयान-3’चं यशस्वी लाँचिंग करण्यात आलं.
चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग करणे, चंद्राच्या पृष्ठभागावर रोव्हर चालवणे आणि चंद्राच्या मातीचे परीक्षण करणे अशी या मोहिमेची मुख्य उद्दिष्ट्ये होती. 23 ऑगस्टला चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करून भारताने इतिहास रचला. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ उतरणारा भारत हा पहिलाच देश ठरला. यानंतर पुढील 14 दिवस प्रज्ञान रोव्हरने चंद्रावर फिरून वैज्ञानिक माहिती गोळा केली. ही मोहीम फत्ते झाल्यानंतर विक्रम लँडर आणि प्रज्ञान रोव्हर या दोघांनाही स्लीप मोडवर जाण्याची आज्ञा देण्यात आली.चांद्रयान-3 मधील प्रॉपल्शन मॉड्यूल हे काही दिवसांपूर्वीच पृथ्वीच्या कक्षेत परत आणण्यात आलं. यातील ‘शेप’ उपकरण हे पृथ्वीचा अभ्यास करणार आहे. प्रज्ञान आणि विक्रम हे भारताचे राजदूत म्हणून चंद्रावर कायम राहतील.
चांद्रयानाचा चंद्राकडे प्रवास सुरू असतानाच, 30 जुलै रोजी इस्रोने DS-SAR उपग्रहाचे प्रक्षेपण केले. यासोबतच अन्य सहा उपग्रहांचे देखील प्रक्षेपण करण्यात आले होते. हे सर्व सॅटेलाईट विविध कक्षांमध्ये प्रस्थापित करण्यात आले. यातील मुख्य उपग्रह हा सिंगापूरचा होता.
चांद्रमोहीम यशस्वीपणे पार पाडल्यानंतर इस्रोने भारताच्या पहिल्या सौर मोहिमेचे लाँचिंग केले. 2 सप्टेंबर 2023 रोजी PSLV-XL या रॉकेटच्या सहाय्याने ‘आदित्य’ यानाचे प्रक्षेपण करण्यात आले. सूर्याचा अभ्यास करण्यासाठी हे यान पृथ्वी आणि सूर्यादरम्यान असणाऱ्या L1 या लॅग्रेंज पॉइंटवर ठेवण्यात येणार आहे. हा पॉइंट पृथ्वीपासून सुमारे 15 लाख किलोमीटर दूर आहे.18 सप्टेंबरपासूनच आदित्यने सायंटिफिक डेटा गोळा करण्यास सुरुवात केली होती. 30 सप्टेंबरला आदित्यने पृथ्वीचा प्रभाव असणारी कक्षा सोडून लॅग्रेंज पॉइंटच्या दिशेने प्रवास सुरू केला. 7 नोव्हेंबरला आदित्यवरील HEL1OS या पेलोडने सोलार फ्लेअर्सची हाय एनर्जी इमेज क्लिक केली. यानंतर 1 डिसेंबरला SWIS उपकरणाने सूर्याचा अभ्यास सुरू केला. 8 डिसेंबरला SUIT पेलोडने सूर्याचे पहिले फुल-डिस्क फोटो क्लिक केले.
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिलेल्या माहितीनुसार, साधारणपणे 7 जानेवारी 2024 रोजी आदित्य उपग्रह अपेक्षित ठिकाणी पोहोचू शकतो. गगनयान मोहिमेच्या माध्यमातून भारत पहिल्यांदाच अवकाशात मानवाला पाठवणार आहे. या मोहिमेसाठी विविध प्रकारच्या चाचण्या यशस्वीपणे पार पडल्या. तसंच यावर्षीच अंतराळवीरांचा सराव देखील सुरू करण्यात आला आहे.