शिर्डीत दर्शनाला जाणाऱ्यासाठी महत्त्वाची बातमी, असा आहे न्यायालयाचा आदेश

 नाताळ आणि नवीन वर्षाच्या सुट्यांमध्ये अनेक जण फिरायला जाण्याचा बेत आखतात. या दिवसात अनेक जण शिर्डीला साई बाबांच्या दर्शनासाठीसुद्धा जातात. तुम्हीसुद्धा येणाऱ्या काही दिवसात शिर्डीला (Shirdi) जाण्याचा बेत आखत असाल तर ही बातमी खास तुमच्याचसाठी आहे. मंदिरात प्रवेश करण्यासाठी ओळखपत्र आवश्यक असल्याचा आदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. हा नियम इतर साई भक्त आणि ग्रामस्थ दोघांसाठीही असणार आहे. सुरक्षेच्या कारणास्तव शिर्डी साई मंदिरात दर्शनासाठी जाताना ग्रामस्थांना आता ओळखपत्र सक्ती करण्यात आली आहे.

वकरी गेट तसेच साई मंदिर परिसरात‌, प्रशासकीय कामासाठी जाताना ग्रामस्थ , भाविकांना ओळखपत्र दाखवूनच प्रवेश दिला जाणार आहे. तसेच गेटवर ग्रामस्थांची तपासणी देखील केली जाणार आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मंदिर सुरक्षा विभागाने संबधीत सुचना सुरक्षा कर्मचा-यांना दिल्या आहेत.

दररोज हजारो भाविक शिर्डी येथे साई बाबांच्या दर्शनाला येत असतात. यामध्ये व्हीआयपींचा देखील समावेश असतो. सुरक्षेच्या दृष्टीकोणातून मंदिराची व्यवस्था चोख असण्याची जबाबदारी मंदिर प्रशासन नेहमीच बजावत आली आहे. आता यात काही तृटी राहू नये यासाठी न्यायालयाने नविन आदेश दिला आहे. स्थानिक ग्रामस्थ आणि भाविक यांना प्रवेशद्वारावर ओळखपत्र दाखवणे सक्तीचे करण्यात आले आहे.  मंदिरात ये जा करणाऱ्या ग्रामस्थांची तपासणी देखील करण्यात येणार आहे. सुरक्षेच्या दृष्टीने घेण्यात आलेल्या नियमाचे अनेक भाविकांनी स्वागत केले आहे.

काही दिवसांआधीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिर्डी येथे 7 हजार 500 कोटी रूपयांच्या विकासकामांचे भुमीपूजन केले होते. शिर्डी देवस्थानात होत असलेल्या या विकास कामांच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्था चोख ठेवणे प्रशासनासमोर आव्हान आहे. त्यामुळे नुकत्याच आलेल्या आदेशाने मंदिर प्रशासनाचा कार्यभार वाढणार असल्याचेही बोलल्या जात आहे