सांगोला मतदारसंघावर शेकापची पुन्हा सत्ता अबाधित राहिली आहे. डॉ. बाबासाहेब देशमुख हे तरुण वयात आमदार म्हणून निवडून आले आहेत. माजी आमदार शहाजीबापू पाटील व दीपक साळुंखे-पाटील यांचा पराभव झाला आहे.असे असले तरी जाहीर झालेल्या निकालावरून शहाजीबापूंचा पराभव दीपक साळुंखे-पाटील निवडणुकीत उतरल्याने झाल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. त्यामुळे सांगोल्यात ‘धनुष्यबाणा’ला ‘मशाली’नेच रोखल्याची चर्चा रंगत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगोला मतदारसंघासाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला असला तरीही यावेळी शहाजीबापू पाटील पराभूत झाले. शहाजी पाटील यांनी यंदाची ही माझी शेवटची निवडणूक असल्याचे जाहीर केले असले तरी ते राजकारणातून निवृत्त होणार नाहीत, अशी चर्चा आहे. विकासकामांत नेहमीच सहकार्य करू, असे ते जाहीरपणे सांगतात. डॉ. बाबासाहेब देशमुख विरुद्ध शहाजी पाटील अशी दुरंगी लढत झाली असती तर कदाचित वेगळा निकाल लागू शकला असता.
हाती आलेल्या निकालावरून दीपक साळुंखे यांना पडलेल्या 51 हजार मतदानावरून शहाजीबापू यांच्याकडील जास्तीची मते त्यांनी आपल्याकडे खेचली आहेत. शेकापचीही मते वळविण्यात ते यशस्वी झाले. परंतु, याचा सर्वात जास्त फटका शहाजीबापू पाटील यांना बसला आहे. म्हणजेच शहाजीबापूंच्या पराभवात दीपक साळुंखे यांची उमेदवारी असल्याने सिद्ध होत आहे.