सध्या राजकारण हा इव्हेंटचा पण विषय ठरला आहे. राजकारणात चर्चेशिवाय मजा नाही, हे आता नवीन सूत्र समोर येत आहे. हवा केल्याशिवाय कोणी भाव देणार नाही, चर्चा होणार नाही या गोष्टी ओघाने आल्याच. त्यासाठी काही जण अनेक ट्रिक्स, आयडिया लढवतात. त्यातच सध्या विविध आंदोलनं, मोर्चे, उपोषण यामुळे राजकारण ढवळून निघाले आहे. आता नवी मुंबईत लागलेल्या बॅनर्संनी अनेकांचे लक्ष वेधून घेतले आहे.
तो येतोय.. अशा बॅनर सध्या नवी मुंबईच्या ऐरोली मधे झळकले आहेत. हे बॅनर नवी मुंबईकराचं लक्ष वेधून घेत आहेत. तो येतोय घराणेशाहीला सर्व सामन्यांची ताकद दाखवायला. तो येतोय माथाडी कामगारांचा आवाज बुलंद करायला. तो येतोय नवी मुंबईकरांना टोल पासून मुक्ती द्यायला, असे आशय या बॅनरवर लिहला आहे. या बॅनरने नवी मुंबईत नुसता धुमाकूळ घातला आहे. या बॅनरच्या माध्यमातून भाजपा आमदार गणेश नाईक यांना थेट आव्हान देण्याचा जो प्रयत्न आहे, तो केला गेला आहे, अशी चर्चा रंगली आहे. तसंच हे बॅनर कोणी झळकवले हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी नाईकांना या माध्यमातून आव्हान कुणीतरी देत आहे. विधानसभेच्या मैदानात उतरण्याच्या तयारीनेच हे बॅनर लावल्याचे समोर येत आहे. हे बॅनर कोणी लावले हे अद्यापही स्पष्ट नसलं तरी काही दिवसातच त्यावरुन पडदा उठणार आहे.
मी येतोय, घराणे शाहीला सर्वसामान्यांची ताकद दाखवण्यासाठी, मी येतोय पश्चिम महाराष्ट्रातील सुपुत्र आणि स्थानिक भूमिपुत्र यांच्या सर्वांगीण विकासासाठी, मी येतोय टोल माफी मिळवून देण्यासाठी, मी येतोय महिला भगिनींच्या रक्षणासाठी अश्या विविध टॅग लाईन देत हे बॅनर लावण्यात आले असून प्रत्येकाची नजर या बॅनरवर खिळून राहत आहे.