सांगोला तालुक्यातून डाळिंब निर्यातीसाठी २१ हजार २९५ ऑनलाइन नोंदणी

डाळिंब निर्यातीसाठी राज्यातील ७ जिल्ह्यांसह सांगोला तालुक्यातून २१ हजार २९५ डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे.यामध्ये सर्वाधिक सांगोला तालुक्यातील ५ हजारपेक्षा अधिक शेतकऱ्यांनी अनार नेटवर ऑनलाइन नोंदणी करत सहभाग नोंदविला असल्याची माहिती अखिल भारतीय डाळिंब संघाचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी दिली आहे.गेल्या तीन वर्षांपासून डाळिंब फळबागा नैसर्गिक आपत्तीमुळे धोक्यात आल्या असून, परिणामी डाळिंबाच्या उत्पादनातही घट होताना दिसत आहे. देशांतर्गत बाजारपेठेत डाळिंबाला अपेक्षित दर मिळत असल्यामुळे सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकरी डाळिंबाची निर्यात करण्यासाठी पुढे येत आहेत.

गतवर्षी डाळिंबाची निर्यात वाढल्यामुळे डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांना काही अंशी दिलासा मिळाला आहे. देशातून सर्वाधिक डाळिंब निर्यात महाराष्ट्रातून प्रामुख्याने युरोपियन देश सौदी अरेबिया, श्रीलंका आणि थायलंड यासह बांगलादेश, नेपाळ, नेदरलँड या देशात केली जाते.

दरम्यान, डाळिंबाला पोषक वातावरण असल्यामुळे बागा सेटिंग होण्यास अडथळे निर्माण होतात. यंदा डाळिंब निर्यात करण्यासाठी नोंदणी सुरू झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांनी नोंदणी सुरू केली आहे.आतापर्यंत २१ हजार २१५ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. यामध्ये सांगोला तालुक्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांचा सर्वाधिक समावेश असून, त्या खालोखाल सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी नोंद केली आहे. प्रतिकूल परिस्थितीत डाळिंब उत्पादक शेतकरी निर्यातीत पुढे येत आहेत ही बाब अत्यंत चांगली असल्याचे अध्यक्ष प्रभाकर चांदणे यांनी सांगितले.