पुणे-बंगळूर महामार्गावर रस्ता दुभाजकावर मोटारीची धडक होऊन बाळकृष्ण शंकर पवार (38, रा. शाहूनगर रिंगरोड, उरण इस्लामपूर, वाळवा, जि. सांगली) यांचा मृत्यू झाला; तर अंकुश भगवान पाटील (33, उरण इस्लामपूर, वाळवा) हे गंभीर जखमी झाले.महामार्गावरील पंचगंगा पुलाजवळ रविवारी मध्यरात्री दीडच्या सुमारास ही दुर्घटना घडली.
अपघातातील जखमी अंकुशवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात आले. अपघातातील मोटारीचे नुकसान झाले आहे. गांधीनगर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद झाली आहे. बाळकृष्ण पवार, अंकुश पाटील हे मित्राला सोडण्यासाठी शनिवारी रात्री मोटारीने इस्लामपूरहून कोल्हापूरकडे येत होते. पंचगंगा पुलाजवळ रस्ता दुभाजकाला मोटारीची जोरात धडक झाली. त्यात पवार व पाटील गंभीर जखमी झाले. जखमींना तत्काळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच पवार यांचा मृत्यू झाला.जखमी पाटील यांच्यावर उपचार सुरू आहेत. अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.