कोल्हापूर जिल्ह्यात दहाही जागावर महायुतीचे उमेदवार निवडून आल्यानंतर जिल्ह्यात कोणाला आणि किती मंत्री पद मिळणार, याची उत्सुकता लागून राहिली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तिन्ही आमदार तीन वेळा निवडून आल्याने प्रत्येकाने मंत्रीपदावर दावा केला आहे.तर भाजपचे दोन आणि राष्ट्रवादीचा एक आमदार आल्याने त्यांचाही मंत्रीपदावर दावा कायम आहे.राज्यमंत्रीपद असलेल्या राजेंद्र पाटील यड्रावकरांनी देखील मंत्रीपदावर दावा केला आहे. मंत्री हसन मुश्रीफ यांना मंत्रीपद निश्चित आहे. अन्य मंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याचा सस्पेन्स कायम आहे.
मात्र शिंदेंच्या शिवसेनेतच मंत्रिपदावरून आता रेस निर्माण झाली आहे.कोल्हापूर जिल्ह्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एकतर्फी सत्ता देत दहा विधानसभा मतदारसंघात महायुतीच्याच उमेदवारांचा विजय झाला. यामध्ये शिंदेंच्या शिवसेनेकडून चार (यड्रावकर यांच्यासहित) भाजपचे तीन (शिवाजी पाटील यांच्यासहित), राष्ट्रवादी काँग्रेसची एक, जनसुराज्य शक्तीचे दोन यांचा समावेश आहे. ज्येष्ठता आणि अनुभव या सूत्रानुसार मंत्रीपद द्यायचे झाल्यास कागलचे आमदार हसन मुश्रीफ यांचे मंत्रीपद निश्चित समजले जाते. तर शिंदेंच्या शिवसेनेकडून चार आमदार असल्याने कोणाला मंत्रीपदाची संधी मिळणार याबाबत कार्यकर्त्यांना उत्सुकता लागून राहिली आहे.
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील मंत्री कोण असणार हे भाजपच ठरवण्यात असे एकंदरीत चित्र आहे. कारण सत्तेतील सर्वात मोठा पक्ष हा भाजप आहे. शिवाय कोल्हापूर जिल्ह्यात भाजपचे अस्तित्व निर्माण करण्यासाठी पूरक चेहरा भाजपला देणे गरजेचे आहे. त्यातच घटक पक्षातील मंत्रिपदाचा चेहरा भाजपच ठरवणार अशी शक्यता आहे. माजी मंत्री आणि आमदार हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री पदाचा अनुभव आहे.
तेव्हा त्यांनी आघाडी आणि माहितीच्या काळात महत्त्वाच्या पदांची जबाबदारी हाताळली आहे. अशातच मंत्रीपदाचा चेहरा हा जवळपास निश्चित आहे. तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेतून प्रकाश आबिटकर यांना संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. तर पालकमंत्री पदावर चंद्रकांत पाटील यांना कोल्हापुरात आणण्याची शक्यताही नाकारता येत नाही.