गंभीर गुन्ह्यांचा भडका!

विधानसभा निवडणूक आचारसंहितेचा कार्यकाळ संपताच शहर, जिल्ह्यात गुन्हेगारीने पुन्हा एकदा उसळी घेतली आहे. खून, जीवघेणे हल्ले, गोळीबार, अल्पवयीन युवतीवर परप्रांतीय समाजकंटकांकडून अत्याचार, व्यावसायिकाच्या अपहरणासह अन्य गंभीर गुन्ह्यांचा वाढता टक्का चिंताजनक आहे.

शिरोळ व हातकणंगले तालुक्यात अनुक्रमे दानोळी व अंबप येथे खुनाच्या घटनांमध्ये दोन तरुणांचे बळी गेले. एका पाठोपाठ एक घडलेल्या खुनाच्या घटनांमुळे पोलिस यंत्रणेचा वचक आहे की नाही, अशी स्थिती निर्माण झाली आहे. गडहिंग्लज येथे तर एका अल्पवयीन मुलीवर परप्रांतीय तरुणाने अत्यंत क्रूरपणे अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार चव्हाट्यावर आला आहे. नराधमावरील कारवाईसाठी सामान्य नागरिकांना रस्त्यावर उतरावे लागते, याचाच अर्थ स्थानिक पोलिस यंत्रणेचा धाक संपुष्टात आला आहे की काय, अशी स्थिती आहे.

निवडणुकीची प्रक्रिया पार पडताच काळेधंदेवाले, तस्करी टोळ्या, संघटित गुन्हेगार गुन्हेगारी वतुर्ळात पुन्हा सक्रिय होऊ लागले आहेत. समाजकंटकांच्या वाढत्या हालचाली आणि त्यांची गैरकृत्ये समाजमनावर परिणाम करणारे आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणांना कठोर बडगा उगारण्याशिवाय पर्याय राहिला नाही. सांगली जिल्ह्यासह कर्नाटकातील जुगार्‍यांसह काळेधंदेवाल्यांचा महामार्गावरील कागल, गांधीनगर, शिरोली एमआयडीसी तसेच हुपरी, आजरा, चंदगड परिसरात तळ पडल्याचे दिसून येत आहे.