हातकणंगलेत वाढदिवसादिवशी गोकुळच्या सुपरवायझरने  संपविले जीवन

गोकुळ दूध संघाचे सुपरवायझर रणजित बाळासो पाटील (वय 35, रा. सावर्डे, ता. हातकणंगले) यांनी वाढदिवसादिवशीच शेतातल्या झाडाला गळफास लावून घेत जीवन संपविले.मंगळवारी वाढदिवस असल्याने रणजित पाटील यांनी सायंकाळी पाचच्या सुमारास शेताकडे जाऊन येतो मग आपण वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर जाऊ, असे पत्नीला सांगितले.ते खडीचा माळ नावाच्या शेताकडे गेले.

पावणेसात वाजेपर्यंत ते संपर्कात होते. त्यानंतर संपर्क न झाल्याने त्यांना शोधण्यासाठी वडील व भाऊ शेताकडे गेले असता हा प्रकार उघडकीस आला. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. याबाबतची वर्दी योगेश पाटील यांनी वडगाव पोलीसात दिली. योगायोग असा की त्यांचे चुलत भाऊ दीपक जगन्नाथ पाटील यांनीही दोन वर्षांपूर्वी याच दिवशी याच वेळेस त्याच झाडाला गळफास लावून घेत आत्महत्या केली होती. याप्रकरणी पेठवडगाव पोलिसात नोंद झाली आहे.