सध्या जिल्ह्यात दोन वाळू डेपो सुरू असून, आणखी तीन डेपो लवकरच सुरू होणार आहेत. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्याकडून अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर तीन डेपो सुरू होतील.विशेष म्हणजे, जिल्ह्यात आणखी १३ वाळूघाटांचा लिलाव होणार असून, हा प्रस्ताव पर्यावरण विभागाकडे मंजुरीसाठी पाठवला आहे. पर्यावरण विभागाची मंजुरी मिळताच या १३ वाळूघाटांची लिलाव प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती उपजिल्हाधिकारी अमृत नाटेकर यांनी दिली.
२०२३ व २०२४ मध्ये एकूण चार ठिकाणांचा लिलाव झाला. नवीन धोरणानुसार गाळमिश्रित वाळू डेपोंना मंजुरी मिळाली. दक्षिण सोलापूर तालुक्यातील औज (मंद्रुप), पंढरपूर तालुक्यातील देगाव, मोहोळ तालुक्यातील घोडेश्वर तसेच मंगळवेढा तालुक्यातील आरळी या ठिकाणांचा लिलाव झाला.यापैकी औज आणि देगाव हे दोन वाळू डेपो सुरू असून, घोडेश्वर व आरळी हे दोन डेपो पावसाळा संपल्यानंतर चालू करण्याकरिता उपविभागीय अधिकाऱ्यांकडून अहवाल येणार आहे. हा अहवाल प्रलंबित आहे.
२०२४-२५ या नवीन वर्षाकरिता तीन वाळूघाटांचा लिलाव प्रस्तावित आहे. याची ई-टेंडर प्रक्रिया कार्यवाही पूर्ण झाली आहे. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या मंजुरीसाठी त्यांच्याकडे सादर करण्यात आलेले आहेत. यात मंगळवेढा तालुक्यातील बठाण, उचेठाण तसेच पंढरपूर तालुक्यातील तारापूर या ठिकाणांचा समावेश आहे.