विठ्ठलभक्तांची 75 वर्षांपासूनची मागणी अखेर मान्य…..

सांगली, सातारा, सोलापूर या जिल्ह्यातील विठ्ठल भक्तांची गेल्या 75 वर्षांपासून सांगली, सातारा जिल्ह्यातील रेल्वे स्टेशनवरून पंढरपूरला जाणारी रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी होती.

ही मागणी पूर्ण झाली असून खासदार संजय पाटील यांच्या प्रयत्नांना यश आले आहे. खासदार संजय पाटील यांनी पुढाकार घेऊन गेल्या 10 वर्षात अनेक पत्रव्यवहार केले. तसेच रेल्वे मंत्र्यांना भेटून वारकऱ्यांसाठी सांगली मार्गे पंढरपूर जाणारी रेल्वे गाडी सुरू करण्याची मागणी केली होती.

त्यानंतर वेळोवेळी खासदारांनी पाठपुरावा केला. पण गाडी सुरू करण्यासाठी काही तांत्रिक अडचणी होत्या. त्या सोडवण्यासाठी मध्य रेल्वे सल्लागार समितीचे उमेश शाह व झोनल रेल्वे समितीचे सुकुमार पाटील यांनी वेळोवेळी पाठपुरावा केला.यानंतर अखेर वारकऱ्यांचे गेल्या 75 वर्षांचे स्वप्न आता पूर्ण झाले आहे.

सांगलीहून पंढरपूरला जाणारी रेल्वे गाडी आता सुरु करण्यात आली आहे. पंढरपूर-सांगली-सातारा ही गाडी सुरु करण्याबाबतचा रेल्वे बोर्डाने आदेश काढला आहे.गाडी क्र 11027/11028 दादर (मुंबई)-पंढरपूर गाडीचा विस्तार सांगली स्टेशन मार्गे सातारापर्यंत करण्यात आला आहे.

ही गाडी दादर-मुंबईहून सुटून स्वतःच्या निर्धारित मार्गावरून ठाणे, कल्याण, लोणावळा, चिंचवड, पुणे, उरूली, केडगाव, दौंड, भिगवण, जेऊर, केम, कुर्डूवाडी मार्गे पंढरपूरला येईल.पंढरपूरहून पुढे सांगोला, मसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठेमंहांकाळ, मिरज, सांगली, भिलवडी, किर्लोस्करवाडी, ताकारी, कराड, मसूर, कोरेगाव मार्गे साताराला जाईल. साताऱ्याहून परत ताकारी, किर्लोस्करवाडी, भिलवडी, सांगली, मिरज, कवठेमहांकाळ, ढालगाव, जत रोड, पंढरपूर, कुर्डूवाडी, केम, जेऊर, भिगवण, दौंड, केडगाव, उरुली, पुणे, चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, ठाणे, मार्गे दादर (मुंबई) पोहोचेल.

पंढरपूर-सांगली-सातारा ही गाडी सुरु करण्याबाबतचा रेल्वे बोर्डाने आदेश काढला आहे. त्यामुळे वर्षानुवर्षांपासून असलेली वारकऱ्यांनी विठ्ठल भक्तांच्या मागणी अखेर पूर्ण झाल्याचे खासदार संजय पाटील यांनी सांगितले.