शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवणूक केल्यास एक वर्षात दामदुप्पट रक्कम देतो, असे आमिष दाखवून सांगोल्यातील भुसार व्यापाऱ्याकडून सुमारे १७ लाख ७० हजार ५०० रुपये रक्कम घेऊन त्यांची फसवणूक केली.याबाबत अमर कृष्णात लोखंडे (रा. स्टेशन रोड, सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अंकुश तुकाराम लिगाडे (रा. शिवाजीनगर, सांगोला) व सुनील शहाजी पाटील (रा. कुची, ता. कवठेमंकाळ, जि. सांगली) या दोघांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादीस बिटकॉइन व शेअर मार्केटच्या माध्यमातून पैसे गुंतवणूक करून गुंतवणूकदारास एक वर्षात रक्कम दुप्पट करून देतो, अशी हमी देऊन पैसे दुप्पट करण्याचे आमिष दाखवले तेव्हा फिर्यादीनी २८ फेब्रुवारी २०२३ रोजी समर्थ ट्रेडिंग कंपनीच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावरून सुमारे ७ लाख रुपये पाठविले.
दुसऱ्या एकाच्या बँकेच्या खात्यावर ६ लाख ७८ हजार ५०० रुपये ट्रान्सफर केले तसेच ८ मार्च २०२३ रोजी गुरुप्रसाद ट्रेडिंग कंपनीच्या आयसीआयसीआय बँकेच्या खात्यावरून आरोपीच्या बँक खात्यावर पुन्हा ३ लाख ९२ हजार रुपये असे एकूण १७ लाख ७० हजार ५०० रुपये बैंक खात्यावर वर्ग केले होते.
एका वर्षानंतर ठरल्याप्रमाणे माझे पैसे मला परत द्या, असे म्हणून फिर्यादीने त्यांच्याकडे वारंवार पैसे मागितले असता त्यांनी आज देतो, उद्या देतो, असे म्हणून टाळाटाळ सुरू केली. आरोपीने सर्व रक्कम दोन महिन्यात देतो, असे सांगितले. त्यानंतर फिर्यादीने तुम्ही १००- रुपयांच्या स्टॅम्प पेपर स्टॅम्पवर लिहून देऊनही गुंतवणुकीचे पैसे परत दिले नसल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.