विधान परिषदेसाठी महायुतीच्या माजी आमदारांमध्ये स्पर्धा

विधानसभा निवडणुकीत भरघोस बहुमत मिळवून भाजपच्या अधिपत्याखाली महायुती सत्तेवर आल्यानंतर आता मंत्रिमंडळात कोणाकोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता असतानाच दुसरीकडे विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त पाच सदस्यांमधून वर्णी लागण्यासाठी सोलापुरातील महायुतीच्या माजी आमदारांमध्ये स्पर्धा लागल्याचे बोलले जाते. विधान परिषदेवर राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांपैकी सात सदस्यांची नियुक्ती विधान परिषद निवडणूक आचारसंहिता लागू होण्यापूर्वी झाली होती. उर्वरित पाच सदस्यांच्या नियुक्त्या लवकरच होण्याची अपेक्षा आहे. त्या अनुषंगाने सोलापुरात पंढरपूरचे भाजपचे माजी आमदार प्रशांत परिचारक, माळशिरसचे याच पक्षाचे माजी आमदार राम सातपुते, बार्शीचे शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे माजी आमदार राजेंद्र राऊत आणि सांगोलाचे माजी आमदार शहाजीबापू पाटील या चौघांची नावे इच्छुक म्हणून चर्चेत आहेत.