वाळवा तालुका काँग्रेस कमिटीच्या कार्यालयाचा वाद ऐन विधानसभा निवडणुकीत उफाळला होता. या कार्यालयावर राष्ट्रवादीने ताबा मिळवला आहे. तो सोडावा, यासाठी काँग्रेस नेते जितेंद्र पाटील, वैभव पवार, विजय पवार, नंदकुमार कुंभार यांच्यासह पदाधिकाऱ्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. त्यावेळीही पक्षात संभ्रमावस्था होती. तालुकाध्यक्ष जितेंद्र पाटील व जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब पाटील-साखराळकर यांच्यात महाविकास आघाडीसमवेत जाण्यात कार्यकर्त्यांची विभागणी झाली आहे.मुळात पक्षाची तालुक्यात ताकद क्षीण झाली आहे. बोरगाव जिल्हा परिषद वगळता वाळवा तालुक्यात हाताच्या बोटांवर मोजण्याइतपत कार्यकर्ते उरले आहेत.
मात्र आजही काँग्रेसला जनाधार आहे. या संधीचा लाभ घेत येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत पक्षाने ताकदीने उतरावे, असा काँग्रेसमध्ये मतप्रवाह आहे; तर या पक्षाला गृहीत धरून त्यांना बाजूला करण्याचे काम जयंत पाटील समर्थकांकडून होईल, अशी भीती काँग्रेसमध्ये आहे. वाळवा तालुक्यात राष्ट्रवादीच्या स्थापनेनंतर काँग्रेसची अवस्था केविलवाणी झाली आहे. नानासाहेब महाडिक, बाळासाहेब पाटील, जितेंद्र पाटील एकत्रित असताना तालुक्यात काँग्रेसची ताकद दखलपात्र होती. मात्र गेल्या दहा वर्षांपासून बोरगाव जिल्हा परिषद वगळता पक्षाला सर्वत्र अस्तित्वाची लढाई लढावी लागत आहे. इस्लामपूर नगरपालिका कार्यक्षेत्रात वैभव व विजय पवार काँग्रेसची पताका घेऊन लढत आहेत. मात्र ‘मविआ’ म्हणून ते जयंत पाटील यांच्यासमवेत नसतात.
जितेंद्र पाटील बोरगाव जिल्हा परिषद मतदारसंघावर आपले वर्चस्व राखून आहेत. मात्र त्यांनाही आपली ताकद तालुकाभर वाढवता आलेली नाही. इस्लामपुरात अॅड. मनीषा रोटे, राजेंद्र शिंदे, शाकीर तांबोळी असे अन्य कार्यकर्ते आहेत.काँग्रेस कार्यालयाच्या मुद्द्यावरून या विधानसभा निवडणुकीत पवार बंधू व जितेंद्र पाटील यांनी वेगळी भूमिका घेतली. कार्यालय ताब्यात द्या, तरच जयंत पाटील यांचा प्रचार करू; अन्यथा आम्हाला गृहीत धरू नका, असा संदेश त्यांनी राष्ट्रवादीला दिला.
जयंत पाटील यांनी त्यांच्या मुद्द्याकडे दुर्लक्ष केले. अॅड. मनीषा रोटे, राजेंद्र शिंदे जयंतरावांसोबत होते. त्यांनी इस्लामपूर नगरपालिकेत आम्हाला सन्मानजनक वागणूक द्या, आमचे उमेदवार राष्ट्रवादीबरोबर आघाडी करत नगरपालिकेच्या रिंगणात उतरवा, असा शब्द घेण्याचा प्रयत्न केला; मात्र त्यालाही जयंत पाटील यांनी दाद दिलेली नाही. जितेंद्र पाटील, विजय पवार यांनी व्यासपीठावर न जाता राष्ट्रवादीला विरोध केला. जयंत पाटील निवडून आले; मात्र तालुक्यात राष्ट्रवादी व काँग्रेसमध्ये कलगीतुरा रंगला. त्यामुळे या काँग्रेस गटाची आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काय भूमिका राहणार, याबाबत उत्सुकता आहे.