राज्याच्या विधानसभेत आज पुन्हा एकदा हशा, खसखस, चिमटे आणि टोमणे ऐकायला मिळाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार, नाना पटोले, जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांनी एकमेकांना चांगलेच टोले लगावले.त्यामुळे सभागृहात एकच खसखस पिकली. त्यातच जयंत पाटील यांच्या सूचक विधानाने तर खसखस पिकलीच, पण नव्या चर्चेला वाटही मोकळी करून दिली आहे. त्यामुळे जयंत पाटील हे अजितदादांच्या पक्षात जाणार का? अशी चर्चा आता रंगायला सुरुवात झाली आहे.विधानसभा अध्यक्ष म्हणून राहुल नार्वेकर यांची निवड करण्यात आली आहे.
त्यांनी बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी त्यांच्या अभिनंदनाचा ठराव मांडण्यात आला. त्यांच्या अभिनंदनाच्या ठरावावर बोलताना चांगलाच हास्यविनोद रंगला. यावेळी विधानसभा अध्यक्षांची किती जरब असते आणि त्यांचा मान कसा सर्वांनी ठेवला पाहिजे, याची माहिती जयंत पाटील देत होते. त्यासाठी त्यांनी 1990चा एक किस्सा सांगितला. मधुकर चौधरी विधानसभा अध्यक्ष होते. 90 साली मी पहिल्यांदा अध्यक्ष झालो, असं जयंत पाटील म्हणाले. त्यावर अध्यक्ष नाही, आमदार, असं अजितदादा म्हणाले. त्यानंतर जयंत पाटील यांनी तात्काळ सारवासारव करत वाक्य दुरुस्त केलं.
पहिल्यांदा मी आमदार झालो. किती लक्ष आहे बघा माझ्यावर, असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.जयंत पाटील यांना दादांनीही तात्काळ प्रत्युत्तर दिलं. माझं लक्ष आहे. तुम्ही कधी प्रतिसाद देताय? असा सवाल अजित पवार यांनी केला. त्यावर आपल्या पक्षाचं एक वाक्य आहे दादा. योग्यवेळी योग्य निर्णय, असं सूचक विधान जयंत पाटील यांनी करताच सभागृहात एकच हस्यकल्लोळ झाला. त्यामुळे जयंत पाटील यांच्या मनात काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे.