सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त तालुक्यांची पाहणी करण्यासाठी १४ व १५ डिसेंबर रोजी केंद्रीय समितीचे पथक सोलापूर दौऱ्यावर येत असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
जिल्ह्यात प्रारंभी दुष्काळी निकषात करमाळा, सांगोला, माळशिरस, बार्शी आणि माढा या पाच तालुक्यांचा समावेश झाला होता. या तालुक्यांची पाहणी करताना जून-जुलै महिन्यातील पहिल्या तीन ते चार आठवड्यांचा पडलेला पाऊस, सप्टेंबर अखेरचा पाऊस आदी विविध निकष लावले.
जिल्ह्यातील पाच तालुकेच राज्यस्तरीय दुष्काळ देखरेख समितीने ठरवून दिलेल्या निकषात बसले होते. तद्नंतर इतर तालुक्यांचीही दुष्काळी स्थिती पाहून त्याचेही अहवाल जिल्हास्तरीय दुष्काळ देखरेख समितीद्वारे गेले होते.
राज्यस्तरीय समितीद्वारे पुढील आदेश गेल्यावर पूर्ण जिल्हा दुष्काळी जिल्हा म्हणून जाहीर झाला.या सर्वच तालुक्यांत दुष्काळी उपाययोजना लागू होणार असल्याने हे केंद्रीय पथक बार्शी, सांगोला आणि माळशिरस तालुक्यात पाहणी करण्याची शक्यता असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
यंदा जुलैमध्ये पडलेल्या कमी पावसावरच खरिपाच्या पेरण्या आटोपल्यानंतर आजतागायत मोठा पाऊस पडला नाही. पेरणी होऊन पिके बहारदार आल्यावर पुन्हा ऑगस्टमध्ये पावसाने महिनाभर ओढ दिल्याने खरिपाचे उत्पन्नही मोठ्या प्रमाणात घटले आहे.
आता रब्बीतील पेरणीही कमीच झाली आहे. यामुळे लवकरच जिल्ह्याला दुष्काळी उपाययोजना मिळण्याची शक्यता आहे.