रोटरी क्लबमुळे जगातून संपूर्ण पोलिओ निर्मूलन शक्य डॉ. साजिकराव पाटील

रोटरी इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३१३२ च्या प्रांतपाल रो. स्वाती हेरकळ यांनी महाराष्ट्रातील ११ प्रशासकीय जिल्ह्यांमध्ये पोलिओ दिन हा उपक्रम एकाचवेळी राबविण्यात यावा, असे सूचित केल्यानुसार सांगोला येथील रोटरी क्लबच्या वतीने पोलिओ दिनानिमित्त रॅली काढण्यात येवून विवीध शाळांमधून मराठी, इंग्रजी व हिंदी भाषांमध्ये पोलिओ लसीकरणच्या व्हिडीओ क्लिप्स दाखविण्यात आल्या. शिवाय वर्तमानपत्रे, फेसबुक व व्हॉट्सअॅप या सोशल मीडियाद्वारेही जनजागृती करण्यात आली.

या कार्यक्रमादरम्यान बोलताना रोटरी क्लबमुळे जगातून संपूर्ण पोलिओ निर्मूलन शक्य झाले असल्याचे मत रोटरी क्लब ऑफ सांगोलाचे अध्यक्ष रो. डॉ. साजिकराव पाटील यांनी व्यक्त केले. पोलिओ हा कोणत्याही वयात संभवू शकतो. पण, प्रामुख्याने पाच वर्षांखालील मुलांमध्ये त्याची जास्त प्रमाणात लागण होऊ शकते. लसीकरण करून पोलिओवर मात करणे शक्य आहे. या पार्श्वभूमीवर रोटरीने १९८५ मध्ये जागतिक पोलिओ निर्मूलनासाठी पुढाकार घेऊन पोलिओ प्लस कार्यक्रम सुरु केला.

लसीकरण माध्यमातून पोलिओ निर्मूलन करण्यात रोटरीचे मोठे योगदान आहे. रोटरीने १.६ अब्ज डॉलर्स खर्च करून अगणित स्वयंसेवकांमार्फत १२२ देशांमधील २.५ अब्जाहून अधिक मुलांचे लसीकरण केले आहे. ग्लोबल पोलिओ निर्मूलन संस्थेतही रोटरीचा सहभाग आहे. पोलिओच्या रुग्ण संख्येत १९८० पासून ९९.९ टक्के घट झाली आहे. अफगाणिस्तान, नायजेरिया व पाकिस्तान या तीन देशांमध्ये पोलिओचे रुग्ण सध्या आढळत असून, जगभरात २०१५ मध्ये ७५ पेक्षा कमी रुग्ण आढळले होते, असे रो. डॉ. साजिकराव पाटील यांनी यावेळी सांगीतले.

अन्य संस्थांसह रोटरीने पोलिओ निर्मूलनासाठी उभ्या केलेल्या प्रत्येक डॉलरसाठी बिल आणि मेलिंडा गेट्स फाउंडेशन एकास एक प्रमाणात ३५ दशलक्ष डॉलर्सची मदत या वर्षात करणार आहे. हा निधी वैद्यकीय कर्मचारी, प्रयोगशाळा उपकरणे, आरोग्य कर्मचारी आणि पालक व शैक्षणिक साहित्य इत्यादींसाठी वापरला जाईल. रोटरीचे सदस्य युनिसेफ आणि इतर भागीदारांबरोबर विविध भागातील तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करीत असल्याची माहिती सांगोला रोटरी क्लबचे अध्यक्ष रो. डॉ. साजिकराव पाटील यांनी या समयी दिली.