महाराष्ट्र काँग्रेसमध्ये होणार मोठा बदल, प्रदेशाध्यक्ष पदासाठी रस्सीखेंच, ‘ही’ नावं चर्चेत

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बहुमत मिळाले. तर महाविकासआघाडीचा सुफडासाफ झाला. महायुतीला २३० जागांवर विजय मिळाला. तर महाविकासआघाडीला केवळ ४६ जागांवर समाधान मानावे लागेल.राज्यात फक्त १६ जागांवर काँग्रेसचे उमेदवार निवडून आले आहेत. यामुळे काँग्रेसवर मोठी नामुष्की ओढावली. विधानसभा निवडणुकीनंतर काँग्रेसचा दारुण पराभव झाल्यानतंर सध्या काँग्रेसच्या गोटात मोठ्या हालचाली सुरु आहेत. महाराष्ट्र काँग्रेसमध्ये लवकरच प्रदेशाध्यक्ष बदलला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

नाना पटोले यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. त्यामुळे आता नवा प्रदेशाध्यक्ष कोण असणार याची चर्चा रंगली आहे. यात विजय वडेट्टीवार, बाळासाहेब थोरात, विश्वजित कदम, यशोमती ठाकूर, सुनील केदार यांच्यासह इतर काही नावांची चर्चा सुरु असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तर दुसरीकडे नाना पटोले यांची गटनेतेपदी निवड केली जाणार आहे. तर मुख्य प्रतोद पदी अमित देशमुख यांची निवड होणार असल्याचे बोललं जात आहे