मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील लाभार्थी महिलांना आता डिसेंबर महिन्यातील १५०० रुपये कधी मिळणार, याची उत्सुकता लागली आहे. तर जे योजनेसाठी पात्र नव्हते, तरीदेखील अर्ज केले आहेत त्यांना आता आपल्याला दीड हजारांचा लाभ मिळेल की नाही, याची धाकधूक आहे.विधानसभा निवडणुकीपूर्वी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यातील महिलांसाठी (कुटुंबाचे वार्षिक अडीच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न) लाडकी बहीण योजना आणली.
दिवाळीत भाऊबीज म्हणून राज्य सरकारने लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता ॲडव्हान्स दिला होता. आता मकर संक्रांतीच्या निमित्ताने देखील नव्याने सत्तेवर बसलेले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात लाडक्या बहिणींना डिसेंबर व जानेवारीचे दोन हप्ते (प्रत्येकी तीन हजार रुपये) दिले जातील, असे वरिष्ठ अधिकारी सांगत आहेत.
