‘बिग बॉस मराठी’च्या पाचव्या पर्वात टिकटॉक स्टार सूरज चव्हाणने सहभाग घेतला होता. ‘बिग बॉस’च्या घरात असताना सूरजने बरेचदा त्याचे हालाखीचे दिवस बोलून दाखवलेले. ‘बिग बॉस’ची ट्रॉफी जिंकल्यावर मी माझं स्वतःचं घर बांधणार असल्याचेही बरेचदा म्हटलं होतं.त्याच्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बऱ्याच जणांनी पुढाकारही घेतला. आता अखेर या घराच्या कार्याचा श्रीगणेशा झाला आहे. नुकतेच सूरज चव्हाणच्या नवीन घराचे भूमिपूजन पार पडले.
‘बिग बॉस’ जिंकल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार यांनीसुद्धा सूरजची भेट घेऊन त्याच्या घराच्या स्वप्नाला हातभार लावण्याचे वचन दिले होते आणि आता हे काम अंतिम टप्प्यात आलं आहे.
लवकरच सूरजचं नवं घर उभं राहणार आहे. येत्या सहा महिन्यात त्याचे हे नवीन घर उभे राहणार असल्याचा खुलासा स्वतः सूरजनेच केला आहे. तसंच या नवीन घरासाठीचे फर्निचर धनंजय पोवार यांच्या ‘सोसायटी फर्निचर’मधील असणार आहे असंही त्याने म्हटलं आहे. धनंजय पोवार यांच्या युट्युब चॅनेलद्वारे एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे, ज्यात सूरजने त्याच्या नवीन घराबद्दलचे भाष्य केलं आहे. तर धनंजय यांनीही सूरजच्या नवीन घरात त्यांच्या दुकानातील वस्तू देणार असल्याचे सांगितलं आहे.
या व्हिडीओमध्ये धनंजय असं म्हणतात की, ‘येत्या सहा महिन्यांत सूरज चव्हाणच्या घराचे बांधकाम पूर्ण होणार आहे. 2BHK घर त्याने बांधलं आहे. होणाऱ्या मुलांसाठी त्याने आताच रूम केल्या आहेत. भविष्यात मुलं होतील तेव्हा होतील पण त्याने त्यांच्यासाठी आताच व्यवस्था केली आहे. तसंच त्याच्या घरासाठी सोसायटी फर्निचरमधून तो सामानही घेणार आहे. आपल्या सोसायटी फर्निचरमधून तो सोफा, बेड, गाडी, कपाट अशा काही वस्तूही घेणार आहे’.
यानंतर डीपी सूरजला ‘तू आपल्या दुकानात खरेदी करायला येणार ना? तू तसं कबूल केलं आहेस?’ असं विचारतात. यावर सूरजही त्यांना ‘हो’ असं उत्तर देतो.