टीम इंडिया विरुध्द इंग्लंड यांच्यातील 25 जानेवारीपासून कसोटी मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेआधी मंगळवारी 23 जानेवारी रोजी हैदराबादमध्ये 4 वर्षांनंतर बीसीसीआय पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं आहे. या पुरस्कार सोहळ्यात गेल्या 4 वर्षात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या खेळाडूंचा सन्मान करण्यात आला आहे.
बीसीसीआयचा हा पुरस्कार पॉली उमरीगर क्रिकेटर ऑफ द ईअर या नावानेही ओळखला जातो.टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 2019-20 या काळात केलेल्या कामगिरीसाठी सर्वोत्तम खेळाडू म्हणून पुरस्कार देण्यात आला. हा पुरस्कार घेतल्यानंतर मोहम्मद शमीने प्रतिक्रिया दिली. “मी देशासाठी आणि टीमसाठी दुखापत असतानाही खेळू शकतो, त्यानंतर जे होईन ते पाहिलं जाईल”, असं शमी म्हणाला.शमीनंतर आर अश्विन याला 2020-21 या काळात केलेल्या कामगिरीसाठी बेस्ट क्रिकेटर अवॉर्ड देण्यात आला.
अश्विन याच्यानंतर यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (2021-22) आणि त्यानंतर शुबमन गिल (2022-23) याचा सन्मान करण्यात आला. पुरस्कार मिळाल्यानंतर हे चौघे खेळाडू आनंदी होते.दरम्यान हैदराबादमध्ये आयोजित या कार्यक्रमात इंग्लंड क्रिकेट टीमचे कोच ब्रँडन मॅक्युलम हजर होता. त्यासह बीसीसीआय अध्यक्ष जय शाह आणि उपाध्यक्ष राजीव शुक्ला उपस्थित होते. त्याशिवाय टीम इंडियाचे कोच राहुल द्रविड, कॅप्टन रोहित शर्मा, माजी फिरकीपटून अनिल कुंबळे, मिताली राज, झूलन गोस्वामी आणि इतर आजी माजी दिग्गज उपस्थित होते.तसेच टीम इंडियाचे माजी खेळाडू रवी शास्त्री आणि फारुख इंजिनिअर या दोघांना क्रिकेटमधील भरीव योगदानासाठी सीके नायडू लाईफटाईम अचीवमेंट अवॉर्डने सन्मानित करण्यात आलं.