परभणी प्रकरणी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वादग्रस्त वक्तव्याचा हातकणंगले तालुका समविचारी परिवर्तनवादी कार्यकर्त यांच्याकडून पेठवडगाव येथे निषेध व्यक्त करण्यात आला. परभणी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील संविधान प्रतिकृतीची 5 विटंबना करणाऱ्या समाजकंटकावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्याच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करावी.
तसेच संविधान सन्मानार्थ अटकेत असलेल्या सोमनाथ सूर्यवंशी याचा न्यायालय कोठडीत मृत्यू झाला आहे. त्याचा मृत्यू हा संशयास्पद आहे. सोमनाथ सूर्यवंशी याच्या मृत्यूस कारणीभूत असणाऱ्या संबंधित पोलीस अधिकाऱ्यांचे निलंबन करून त्यांच्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी करण्यात आली.
तसेच संसदेत देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा व त्यांची मंत्रिमंडळातून तात्काळ हकालपट्टी करावी, अशा विविध मागण्यांसाठी पेठवडगाव येथील नगरपालिका चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासमोर जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी पेठवडगाव पोलीस ठाण्याचे पो. नि. विलास भोसले यांना निवेदन देण्यात आले. यावेळी हातकणंगले तालुका समविचारी परिवर्तनवादी कार्यकर्ते व पेठवडगाव परिसरातील आंबेडकरी अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते.