सामुदायिक शेतीतून शेती किफायतशीर ठरेल: डॉ. चेतन नरके 

शेती हा व्यवसाय असून भौगोलिक परिस्थितीचे ज्ञान असणे आवश्यक आहे. पिकांची विचारपूर्वक निवड, टेक्नॉलॉजीचा वापर, तांत्रिकदृष्ट्या मार्गदर्शन व प्रोसिडींग इंडस्ट्रीज याचा विचार करून सामुदायिक शेती सुरू केली तर आर्थिक साक्षरता निर्माण होईल शेतकऱ्यांनी जमाखर्च ठेवला तर शेती व पूरक उद्योग किफायतशीर असल्याचे लक्षात येईल असे मत डॉ. चेतन नरके यांनी व्यक्त केले.अध्यक्षस्थानी माजी मंत्री प्रकाश आवाडे उपस्थित होते. ते यशवंत मंगल कार्यालय हुपरी येथे लोकसेवक स्व. आ. बा. नाईक व एल. वाय. पाटील यांच्या स्मृतीदिनानिमित्त आयोजित पुरस्कार वितरण कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी मुठभर धान्याच्या संकल्पनेतून उभी राहिलेली पैसा फंड सेवा सोसायटी बँकेचा दर्जा असलेली देशातील अग्रगण्य बँक आहे. असे कौतुकोद्गार काढले.

सहकारातून प्रगती साधण्यासाठी सहकार युवा पिढीला समजावून घेणे काळाची गरज असून महिलांना सहकार क्षेत्रात संधी मिळाली तर निश्चितपणे समाजामध्ये परिवर्तन घडवून आणता येईल असे मत माजी नगराध्यक्षा डॉ. नीता माने यांनी व्यक्त केले. यावेळी राजेंद्र राशिनकर, शितल मोरबाळे, धनंजय खेमलापूरे, शिवाजीराव माळी, राजीव कोरे यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. हर्ष शेटे, वसुंधरा देसाई यांचा विशेष सन्मान करण्यात आला. स्वागत अध्यक्ष आण्णासाहेब भोजे, प्रास्ताविक एमडी शिवराज नाईक, आभार संचालक कल्लाप्पाण्णा गाट व सुत्रसंचलन शिवाजी पाटील यांनी केले. यावेळी विविध संस्थांचे पदाधिकारी, संचालक, इतर मान्यवर, सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.